
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी मुंबई :- नवी मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेली असतानाच आता राष्ट्रवादीतही आता इनकमिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईत राजकीय हवा अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीकडून भाजपला शह देण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू आहे. तसेच गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीकडूनदेखील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
राज्यात आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून राजकीय घडामोडींना वेग आला असून नवी मुंबईत राष्ट्रवादी लवकरच भाजपाला मोठा धक्का देणार आहे.
नवी मुंबईतील भाजपाचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या नऊ नगरसेवकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. भाजप वरिष्ठ नगरसेवक आणि मनपा माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, सुनिल तटकरे उपस्थित होते.