
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही देखील चांगल्या पगार वाढीच्या प्रतिक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणातून भारतात यावर्षी म्हणजे 2022 मध्ये घसगशीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Aon या भारतातील अग्रगण्य जागतिक व्यावसायिक सेवा कंपनीने केलेल्या वेतनवाढीच्या सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे.
40 पेक्षा जास्त उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे ही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वाधिक पगारवाढ देणाऱ्या उद्योगांमध्ये ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल, हाय-टेक/माहिती तंत्रज्ञानासह लाईफ सायन्स सेवांचा यांचा समावेश आहे. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये होणारी पगारवाढ ही 9.9 टक्के इतकी असेल असा विश्वास विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला असून, 2021 मध्ये ही टक्केवारी 9.3 टक्के इतकी होती.
कोरोनाच्या फटक्यातून अनेक कंपन्या सावरत असून, कंपन्यांच्या आर्थिक स्थितीतही बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. विशेष गोष्ट म्हणजे होणारी ही पगारवाढ मागील पाच वर्षातील सर्वाधिक असेल असे देखील सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.