
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लुधियाना :- माजी केंद्रीय कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी कॉंग्रेस सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटले आहे की, राज्यसभेत जागा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा लोकांना असे करण्यास प्रवृत्त करते. यांचा कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आज लुधियाना येथे पत्रकार परिषदेत बोलताना तिवारी म्हणाले की, जेव्हा एखादा नेता कॉंग्रेस सोडतो तेव्हा ते कॉंग्रेसचे नुकसानच असते. पण अश्विनीकुमार यांना राज्यसभेचे सदस्यत्व खुणवत असावे त्या इराद्यानेच त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला असावा.
काल आश्विनीकुमार यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून कॉंग्रेसचा राजीनामा दिला. ते गेली 46 वर्षे कॉंग्रेसचे सदस्य होते.
तथापि, सध्या त्यांच्यावर कॉंग्रेसची कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती तसेच ते पक्षाच्या कोणत्या पदावरही कार्यरत नव्हते. ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निकटवर्ती मानले जातात. आपल्याला प्रतिष्ठेनुसार काम करण्यासाठी आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे अश्विनीकुमार यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.