
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. लता दीदी गेल्या आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनंतर बप्पी दा यांनी जगाचा निरोप घेतला. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा बप्पा लहरी अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्याची प्रतीक्षा होती. तो मुंबईत दाखल होताच आज गुरुवारी बप्पी दा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बप्पी लहरी यांचं पार्थिव घरातून स्मशानभूमीत नेले जात असताना त्यांची मुलगी धाय मोकलून रडताना दिसली. तिची अवस्था बघून सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. बप्पी लहरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि वारंवार छातीत जंतुसंसर्ग होत होता. यामुळे सिंगरला 29 दिवस जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यादरम्यान बप्पी दा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. गायक यांनी रुग्णालयात आपल्या मुलीच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला.
बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952रोजी झाला होता. बॉलिवूडमध्ये 70 च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती. बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती.
अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. 2014 च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन 2014 मध्ये त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती.