
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी मोठ्या थाटात साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता व नादुरुस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्याबाबतचे पत्र नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांना दिले आहे. मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोना सारखी जागतिक महामारी सुरू होती. त्यामुळे शासनाने सर्वच सण – उत्सवावर अंकुश आणले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देखील होणार्या कार्यक्रमावर अंकुश आणले होते. यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे राज्य शासनाने शिवजयंतीला परवानगी दिली आहे.
त्यामुळे शहरात अनेक शिवजयंती मंडळांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता व नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याबाबतचे पत्र नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांना दिले आहे. जेणेकरुण शिवजयंतीच्या पार्श्वभुमिवर शहरात विद्युत रोषणाई व शहराची सर्वत्र स्वच्छता दिसेले व शिवजयंती आनंदाच्या वातावरणात पार पडेल अशी माहिती आ. बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे.