
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :- वन हक्क कायद्याच्या अधिकारात प्राप्त झालेल्या वनजमिनीवर दावेदारांनी शेती व फळझाडे राखण्यासाठी बांधलेल्या झोपड्या पाडून गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणात पाहणी करण्यासाठी केंद्रीय जनजाती आयोगाच्या सदस्यानी विक्रमगड, जव्हार व मोखाडा येथे पहाणी दौरा केला. जिल्ह्यात दिलेल्या वन पट्ट्यांमध्ये नागरिकांनी विविध प्रकारची लागवड केली होती. या लागवडीला राखण्यासाठी काही ठिकाणे कच्च्या स्वरूपाच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. जव्हार विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अमित मिश्रा यांनी या झोपड्यांच्या उभारणी वर आक्षेप घेऊन अनेक झोपड्या निष्कासित केल्या. तसेच दावेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात स्थानिक बाधित आदिवासी बांधवांनी वयम् संस्थेच्या माध्यमातून वन विभाग, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय जनजाती आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. आयोगासमोर काही महिन्यांपूर्वी झालेल्या संयुक्त सुनावणी दरम्यान आयोगाने वनविभागाला फटकारले होते. तक्रार केलेल्या नागरिकांशी भेट घेण्यासाठी केंद्रीय जनजाती आयोगाचे सदस्य अनंता नायक यांनी 13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. त्यांनी काही पीडित वन दावेदारांची प्रत्यक्ष भेट घेतली तर इतर काहींशी जव्हार प्रकल्प कार्यालयात संवाद साधून त्यांची बाजू समजून घेतली.
अनेक वन दावेदारांनी आपल्यावर दाखल केलेले गुन्ह्यांच्या अनुषंगाने न्यायालयात फेरा माराव्या लागत असून कोर्ट कचेरी कामी मोठा खर्च होत असल्याचे सांगितले. या प्रकारचे दाखल करण्यात आले गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती बाधित वन पट्टेधारकांनी पाहणी समिती समोर केली. या प्रसंगी उपवनसंरक्षक, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.