
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी पंतबरोबरच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला विश्रांती
मुंबई ::- वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका सुरू आहेत. सुरुवातीला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर भारताने ३ सामन्यांची टी२० मालिकाही खिशात घातली आहे. नुकताच भारतीय संघाने ईडन गार्डन्सवरील दुसरा टी२० सामना ८ धावांनी जिंकला असून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर उभय संघ रविवार रोजी (२० फेब्रुवारी) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याविषयी मोठे वृत्त पुढे आले आहे.
पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यातून विश्रांती देण्यात आली असल्याचे समजत आहे. तो या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी२० मालिकेतही अनुपस्थित असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पंतला आगामी व्यस्त वेळापत्रक पाहता काही काळासाठी बायो बबलमधून विश्रांती दिली आहे. आता तो थेट श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच संघात पुनरागमन करेल. पंत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारतीय संघाचा भाग आहे आणि तिन्ही स्वरुपात संघाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. येत्या काळात भारतीय क्रिकेटपटूंचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिका झाल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने खेळण्यात व्यस्त होतील. पंतही आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्त्व करताना दिसेल. त्यामुळे सध्या त्याला काही दिवसांसाठी आराम देण्यात आला आहे. आता पंतच्या अनुपस्थित इशान किशन अखेरच्या टी२० सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका सांभाळेल महत्त्वाचे म्हणजे, पंतबरोबरच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यालाही विश्रांती देण्यात आली आहे. तोदेखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी२० सामन्यात आणि श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत अनुपस्थित असेल.
रिषभ पंत आहे चांगल्या फॉर्मात पंतने मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध प्रभावशाली प्रदर्शन केले आहे. त्याने बऱ्याचदा संघाला आवश्यकता असताना चांगल्या खेळी खेळल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना नाबाद ५२ धावांची झटपट खेळी केली होती. त्याच्या या खेळीने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. यापूर्वी वनडे मालिकेदरम्यानही त्याने अर्धशतक झळकावले होते.