
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 1497- हा दिवस पोर्तुगालच्या शाही ज्योतिषांनी अतिशय सावधपणे निवडला होता. राजधानी लिस्बनमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. लोक जत्थ्यांनी समुद्रकिनाऱ्याकडे निघाले होते. किनाऱ्यावर चार नवीन जहाजं दूरच्या सफरीचा आरंभ करण्यासाठी सज्ज होती. शहरातील सर्व उच्चपदस्थ पाद्रीसुद्धा झळाळत्या पोशाखांमध्ये आशीर्वाद देण्यासाठी तिथे आले होते. ते सामूहिक प्रार्थना म्हणत असताना गर्दीतील लोक त्यांच्या सुरात सूर मिसळत होते.
बादशहा रोम मॅन्युअल यांना स्वतःला या मोहिमेत रस होता. आवश्यक नवीन उपकरणं आणि जमिनीचे व आभाळाचा अंदाज देणारे नकाशे घेऊन वास्को द गामाच्या नेतृत्वाखालील ही चार जहाजं प्रदीर्घ प्रवासाला निघणार होती. त्या काळातील आधुनिक तोफाही या जहाजांवर ठेवण्यात आल्या होत्या. जहाजाकडे निघालेल्या सुमारे 170 नाविकांनी बिनबाह्यांचे सदरे घातले होते. त्यांच्या हातात पेटलेल्या मेणबत्त्या होत्या आणि सैन्याच्या शिस्तीत ते जहाजाच्या दिशेने संथपणे पावलं टाकत होते.
या दृश्याची झलक पाहता यावी आणि समुद्रावर प्रवासाला निघालेल्या या नाविकांना निरोप द्यावा यासाठी लोक तिथे जमले होते. त्यांच्या डोळ्यांमधून सुखदुःखाच्या संमिश्र भावना व्यक्त करणारे अश्रू वाहत होते. काही वर्षं लांबणाऱ्या या प्रवासासाठी निघालेले बहुतांश नाविक- किंवा कदाचित त्यांच्यापैकी कोणीच- परत येऊ शकणार नाहीत, हे लोकांना कळत होतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या लोकांना याचीही जाणीव होती की, ही मोहीम यशस्वी झाली तर, युरोपच्या एका कोपऱ्यातला छोटासा पोर्तुगाल देश इतिहासामध्ये एका नवीन प्रकरणाचा आरंभ करणारा ठरेल.
ही जाणीव खरी ठरली. दहा महिने व बारा दिवसांनी हा जहाजांचा ताफा भारताच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आला, तेव्हा युरोपाची समुद्राविषयीची हुरहूर संपुष्टात आली. पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं जग पहिल्यांदाच समुद्रीमार्गाने एकमेकांशी जोडले गेले, किंबहुना ते एकमेकांना भिडले. अटलान्टिक महासागर व हिंद महासागर यांना जोडणारा जलमार्ग सापडला आणि जगाच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं. दुसऱ्या बाजूला कोणा युरोपीय देशाने आशिया व आफ्रिकेत वसाहत स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, त्यानंतर डझनावारी देश काही शतकं दयनीय परिस्थितीला सामोरे गेले आणि त्या परिस्थितीला सामोरं जाऊन बाहेर पडल्यावर अजूनही ते कसेबसे सावरत आहेत.
या घटनेने दक्षिण आशियाच्या इतिहासात इतकी उलथापालथ केली की, वास्को द गामाच्या सफरीविना आपल्या आजच्या जगण्याची कल्पनाही करणं शक्य झालं नसतं. त्या ऐतिहासिक प्रवासामुळे दक्षिण आशियाला- किंबहुना संपूर्ण आशियाला पहिल्यांदाच मका, बटाटा, टोमॅटो, लाल मिरची व तंबाखू इत्यादी पिकांची ओळख झाली. या पिकांविना आजचं जगणं अकल्पनीय आहे.
भारतापर्यंत पोचण्याचा पोर्तुगिजांचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. युरोपच्या पश्चिमेकडचा हा छोटासा देश कित्येक वर्षांपासून आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचा नकाशा तयार करत होता आणि या दरम्यान शेकडो नाविकांना प्राण गमवावे लागले होते.
या मोहिमेत इतकी साधनसामग्री खर्च करणाऱ्या युरोपीय पोर्तुगाल देशाला भारतामध्ये इतकी रुची का होती? तत्पूर्वी काहीच वर्षांआधी 1453 साली उस्मानी सुलतान दुसऱ्या महमदाने कॉन्स्टॅन्टिनोपल (आजचं इस्तंबूल) काबीज करण्यासाठी युरोपात आकाशपाताळ एक केलं होतं. आता पूर्वेकडून बराचसा व्यापार उस्मानी साम्राज्यातून किंवा इजिप्तमधूनच करणं शक्य होत. या प्रदेशांमधील राजवटी हिंदुस्थान व आशियाच्या दुसऱ्या भागांमधून येणाऱ्या उत्पादनांवर- विशेषतः मसाल्यांवर प्रचंड कर लावत असत.
दुसऱ्या बाजूला युरोपातही आशियासोबत जमीनमार्गे होणाऱ्या व्यापारावर व्हेनिस व जीनिव्हा यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झालेली होती. यामुळे इतर युरोपीय देश- विशेषतः स्पेन व पोर्तुगाल यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं. याच कारणामुळे वास्को द गामाची मोहीम सुरू होण्याच्या पाच वर्षं आधी स्पेनमधील ख्रिस्तोफर कोलंबसाच्या नेतृत्वाखाली पश्मिमेकडील मार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. पण कोलंबसाचं नियोजन व माहिती कमी आहे, त्यामुळे तो कधीच भारतात पोचू शकणार नाही, हे पोर्तुगिजांना माहीत होतं. कोलंबसाने अपघाताने एका नवीन खंडाचा शोध लावला खरा, पण त्याला आयुष्याच्या अखेरपर्यंत तो भारतात पोचलाय असंच वाटत राहिलं होतं.
पोर्तुगिजांना मात्र आधीच्या समुद्री मोहिमांमुळे माहीत होतं की, अटलान्टिक महासागराच्या दक्षिणेकडून प्रवास केला, तर आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून हिंद महासागरापर्यंत पोचता येतं आणि असं केल्यावर आशियासोबतच्या व्यापारात इतर युरोपपेक्षा आपल्याला वरचष्मा प्राप्त होईल.वाटेतील असंख्य अडचणींना सामोरं जात वास्को द गामाने युरोपच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडील समुद्रकिनाऱ्याला स्पर्श करण्यात यश मिळवलं. तिथूनसुद्धा भारत हजारो मैल दूर होता आणि तिथवर पोचायचा मार्ग शोधणं अंधारात सुई शोधण्यासारखं होतं.
सुदैवाने केनियाच्या किनाऱ्यावरील मालिंदी शहरात वास्को द गामाची गाठ एका गुजराती मुसलमान व्यापाऱ्याशी पडली. हा व्यापारी स्वतःच्या तळहातावरील रेषांप्रमाणे हिंद महासागरी प्रदेशाबद्दल माहिती राखून होता. त्या घटनेला पाच शतकं उलटून गेल्यानंतरही अरबी जहाजं त्याच गुजराती व्यापाऱ्याच्या नकाशानुसार प्रवास करतात. त्याने ‘फिरंग्यां’ना हिंद महासागराची वाट दाखवली आणि आशियात हजारो वर्षांपासून प्रस्थापित झालेला व्यापारी समतोल कोलमडून पडला.त्याच वाटेने 12 हजार मैलांचा प्रवास करत वास्को द गामा 20 मे 1498 रोजी भारतातील कालिकत इथे येऊन पोचला. या प्रवासात त्याला कित्येक डझन सहकारी गमवावे लागले.
त्या काळी भारताबाबत युरोपियांना फारशी माहिती नव्हती, त्यामुळे कालिकतमध्ये राहत असताना वास्को द गामा हिंदूंनाही वाट चुकून इकडे आलेले ख्रिस्तीच मानत होता. पोर्तुगीज नाविक मंदिरांमध्ये जाऊन तिथल्या हिंदू देवींच्या मूर्तींना माता मरियम आणि देवांना येशू मानून प्रार्थना करत असत. कालिकतध्ये ‘समुद्री राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाने आपल्या महालात वास्को द गामाचं जोरदार स्वागत केलं. पाऊस पडत असताना छत्री लावलेल्या पालखीत बसवून वास्को द गामाला बंदरातून दरबारापर्यंत आणण्यात आलं. पण या आनंदावर थोड्याच वेळात विरजण पडलं- तत्कालीन परंपरेनुसार वास्को द गामाने राजासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या (लाल रंगाची हॅट, पितळेची भांडी, काही किलो साखर व मध), पण या भेटी इतक्या फुटकळ मानल्या गेल्या की पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलेल्या वझिराने त्या भेटी राजाला दाखवण्यास नकार दिला.
याचा परिणाम असा झाला की स्थानिक अधिकारी वास्को द गामाला एखाद्या श्रीमंत देशातील राजेशाही प्रवाशाऐवजी समुद्री डाकू मानू लागले. व्यापारी कोठारं उभारण्यासाठी व पोर्तुगीज व्यापाऱ्यांना कर माफ करण्याची वास्को द गामाची विनंती समुद्री राजाने अमान्य केली. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की, स्थानिक लोकांना अनेक पोर्तुगिजांवर हल्ला करून त्यांना मारून टाकलं. वास्को द गामा प्रचंड संतापला. त्याच्या जहाजावरील तोफांच्या तोडीसतोड काहीच अस्त्रं समुद्री राजाकडे नव्हती. त्यामुळे वास्को द गामाने कालिकतवर बॉम्बगोळे टाकून अनेक इमारती आणि शाही महाल उद्ध्वस्त करून टाकला. अखेर समुद्री राजाला देशाच्या आतल्या भागा पळून जावं लागलं.
हे राजकीय अपयश एका बाजूला सहन करावं लागलं असलं, तरी कालिकतमधील तीन महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान पोर्तुगिजांना अत्यंत स्वस्त दरात अमूल्य मसाले मिळाल्यामुळे त्यांनी जहाजांवर मसाले खच्चून भरून घेतले.