
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी भाषणांमध्ये आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. आज बारामतीकरांना अजित पवारांच्या याच रोखठोक स्वभावाचा नमुना पहायला मिळाला. जोपर्यंत ग्रामपंचायत थकीत वीज बील भरत नाही तोपर्यंत पथदिव्यांचं कनेक्शन मिळणार नाही असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.जोपर्यंत ग्रामपंचायत थकीत वीज बिल भरत नाहीत तोपर्यंत पथदिव्याचं नवीन कनेक्शन मिळणार नाही. पुणे जिल्ह्यात पथदिव्यांची थकबाकी ५२५ कोटी रुपये आहे. त्यातले ३१८ कोटी ही मुळ रक्कम तर २०७ कोटी हे व्याज आहे.
ब्रम्हदेव जरी सरकार चालवायला आला तरीही हे शक्य होणार नाही. लोकांनी किमान वापरलेल्या विजेच्या बिलाचे पैसे भरावेत. वरचं व्याज माफ करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत निर्णय घेऊ शकतो, पण वापरलेल्या विजेचे पैसे भरावेच लागतील असं अजित पवार म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी हजेरी लावली होती. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही आपल्या वक्तव्याने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
राज्यात नव्हे तर देशात इतकी सुंदर इमारत पंचायत समितीची कोणी बांधली नसेल इतकी सुंदर इमारत तुम्ही बांधली आहे. आपल्याला माहिती आहे की दादांचा स्वभाव कसा आहे. मी आजपर्यंत दादांना माझं घर दाखवलं नाही. कारण दादा हे स्वच्छतेविषयी आग्रही असणारं व्यक्तीमत्व असून घर म्हटलं की कचरा हा येतोच म्हणून मी त्यांना माझं घर दाखवलंच नसल्याचं मुश्रीफ म्हणाले.