
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- क्रिकेटच्या चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
भारत आणि वेस्टइंडिजच्या टी-२० मालिकेतून चाहत्यांचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन देखील झाले आहे. दरम्यान माहितीनुसार आयपीएल २०२२ चा थरार २६ मार्चपासून रंगणार आहे. यापूर्वी आगामी आयपीएलचा हंगाम २७ मार्चला सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले होते.
ब्रॉडकास्टर आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) याबाबत चर्चा सुरू आहे. लक्षणीय बाब म्हणजे आगामी १५ व्या हंगामासाठी एकूण १० संघ आमनेसामने असणार आहेत. अलीकडेच झालेल्या मेगा लिलावात २०४ खेळाडूंना विविध संघामध्ये स्थान मिळाले. तर ३३ खेळाडूंना रिटेन करण्यात आले होते. म्हणजेच आगामी हंगामात एकूण २३७ खेळाडू सहभागी असतील.