
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
राज्य महिला आयोगानं दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश !
मुंबई :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत. 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबईतल्या मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत. दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता. पोलिसांच्या अहवालानंतरही आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरही राणेंनी आरोप करुन दिशा सालियनची बदनामी केल्याची तक्रार किशोरी पेडणेकर यांनी केली होती.अखेर राज्य महिला आयोगानं या प्रकरणात लक्ष घातलंय.
सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापकाचे काम केलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे, असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे.
त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना 48 तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.