
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर / प्रतिनिधी :- देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही, अशा शब्दांत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली.
आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकतेच फडणवीस यांनी हे सरकार इमारतींमध्ये अडकून पडले आहे असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई सूडबुद्धीने सुरू आहे अशी विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. या विषयात मी जाणार नाही, आम्ही आमचे काम करत राहणार. पण महत्वाचे म्हणजे दोन महिन्यांपासून आपण बघत असाल उत्तर प्रदेशमधील बेरोजगारी, तिथल्या समस्या यावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष येथे काम करत आहेत. याशिवाय टीका करत असताना विरोधी पक्षाने खालची पातळी गाठली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.