
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.22 संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी१८७६ मध्ये शिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव येथे परीट (धोबी) जातीमध्ये झाला. त्यांचे जन्म नाव डेबू असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. सन १८८४ मध्ये झिंगराजी ने या जगाचा निरोप घेतला. या कुटुंबाचा वारसा मात्र पत्नी सखुबाई व लहानग्या डेबुला देऊन गेला .सखूबाईच्या हंबर्डेयाने सात आठ वर्षाच्या डेबूस अंधकारमय भविष्याच्या वनव्यात लोटले .मात्र या लहान डेबूच पुढे समाज परिवर्तनाचा वनवा झाला .या वणव्यात अज्ञान, मानसिक गुलामगिरी अंधश्रद्धा, अस्पृश्यता , रूढी आणि परंपरा साऱ्या जळून खाक झाल्या. झिंगराजी च्या मृत्यूनंतर माय सखुबाईची पावलं मामाच्या गावाकडे माहेरी अर्थात दापुर कडे वळली वेदनांच्या अनंत वाटा डोळ्यासमोर होत्या.
आठ वर्षाच्या डेबू मायेचा पदर धरीत निरागस नजरेने आपल्या चंद्रभान मामाच्या गावी जाऊन राहू लागला. डेबूजीच संपूर्ण लहान पण त्यांच्या मामाच्या गावात झाले. मामाकडे पुरेशी शेती होती गाई-म्हशी मोठा वाडा होता. डेबुजी मामाकडे लहानाचा मोठा झाला तिथेच आपल्या मामाला शेती कामात मदत करत असायचा गुराखी म्हणूनही मामाकडे काम केली. डेबुजीचे लग्न लहानपणीच सन १८९२ मध्ये झाले. पण ते संसारांमध्ये रमले नाही जगाच्या उद्धारासाठी समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा समाज परिवर्तनाचा वसा घेऊन त्यांनी आपला संसार सोडला अंगावर रंगीबेरंगी चिंध्यांचा पोशाख घालून डोक्यावर खापर तर हातात झाडू घेऊन डेबू प्रत्येक गावागावात फिरू लागले .
आता डेबुजीला लोक हातात घाडगे असल्याने त्यांना ” गाडगेबाबा “म्हणू लागले दिवसभर गावातील आपल्या हातातील झाडूने झाडून गाव स्वच्छ करायचे आणि मग संध्याकाळी मंदिरापुढे किंवा चावडी पुढं उभे राहून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे त्यांच्या हातात ना टाळ-मृदुंग, पेटी, विना होती तर फक्त दोन दगड वाजून गोपाल…गोपाला ..देवकीनंदन गोपाला…! असे मधुर आवाजात किर्तन म्हणाय चे मंग आजूबाजूची लहान मुलं बाया-माणसं डेबूजीच्या कीर्तनात जमा व्हायची त्याकाळी मोठ्या प्रमाणात पशू बळी देण्याची प्रथा समाजात होती . डेबुजी कीर्तनातून लोकांना अत्यंत चिकित्सक पद्धतीने या प्रथेविरुद्ध प्रबोधित करायचे जन्मभरी पोसे l लेकराच्या परी l हाती घेऊनी सुरा l उभा राहे l असा कसा रे तुमचा देव l घेतो कोंबडी, बकऱ्याचा जीव ll कीर्तनात ते म्हणायचे की
डेबू : ज्या धन्याच्या अंतकरणात दया असेल तो सत्पुरुष आहे, सत्पुरुष! मराठी मंडळी देवाच्या जत्रेला ला जाता का नाही ?
लोक : होय बाबा.
डेबू : बकरा नेता का नाही ?
लोक : होय बाबा .
डेबू: मानेचा तुकडा देवापुढे कापता की नाही ?
लोक : होय बाबा.
डेबू : मसाला लावून शिजवून खाता की नाही ?
लोक : होय बाबा .
डेबू : तुमच्या पिढ्या.. अन पिढ्या मरतील
– तुमच्या दगडाच्या देवापुढे कोंबडी, बकरा कापणाऱ्यानो तुमचं कधी बरं होणार …
लोक : नाही बाबा… नाही बाबा
डेबू : कोंबडा , बकरा लहानाचं मोठं करता , चारापाणी खाऊ घालता. अन् दगडाच्या देवापुढे कापून खातात . तुमच्या पोराचं नवस द्या की देवाला ?
लोक : नाही बाबा .
अशाप्रकारे कीर्तन करून लोकांच्या मनातील धार्मिक श्रद्धे सह पशुबळी चा विचार अलगद काढून टाकायचे लोकांच्या मनात लख्खं प्रकाश पडावा म्हणून जे युक्तिवाद बाबा करायचे ते बिनतोड असायचे मग लोकही कीर्तनात रमून जायचे .देवाला फुले वाहा, नारळ फोडा, दानपेटीत पैसे टाका , भटाभिक्षु कांची पोट भरा यापैकी एकही गोष्ट गाडगेबाबांच्या कीर्तनात नव्हती. हे कीर्तन म्हणजे मानवी मूल्याचे सुंदर अस्तित्व होते . भुके नाही अन्न l मेल्यावरी पिडदन ll हे तो चाळवाचाळवी l केले आपणची देवी ll नैवेद्याचा आळ l वेचे ठाकणी सकळ ll तुका म्हणे जड l मज न राखवे दगड ll जिवंतपणीच आपल्या आई-वडिलांना उपाशी ठेवायचे आणि मेल्यावर त्यांचे पिंडदान करण्याच्या नावाखाली स्वतः गडप करायचे .
अशा विकृत परंपरेला गाडगेबाबांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून जबरदस्त हादरा दिला होता. त्यांच्या जीवनातील हा एक प्रसंग अत्यंत बोध घेण्यासारखा आहे. एके ठिकाणी नदीच्या पात्रात पिंडदानाचा धार्मिक विधी सुरू होता . यावेळी गाडगेबाबा त्या ठिकाणी पोहोचले. ते दृश्य पाहून त्यांच्या मेंदूमध्ये विचारांचे प्रचंड वादळ घोंगावू लागले. अंधश्रद्धेच्या नावाखाली कष्टकरी माणसांना गुलाम करणाऱ्या भटभिक्षुकशाहीचे हे ज्वलंत दर्शन गाडगेबाबांना अस्वस्थ करून सोडते . पिंड म्हणून एका द्रोणात भात ठेवलेला होता.
हा पिंड भटजीच्या मंत्रोच्चाराने स्वर्गात पाठवायचा होता. भटजी चे मंत्र उपचार सुरू होते .आणि इतक्यात गाडगेबाबा त्याला विचारतात…
गाडगेबाबा : काय करून राहिले जी ? ( बाबाचा विचित्र वेश पाहून भटजी खेकसला )
भटजी : अरे हे तुला काय कळणार तू गावंढळ माणूस . ही धर्माची बाब आहे. याला अध्यात्म म्हणतात .अध्यात्म हे जे आहे. ते आता स्वर्गातील मृत्त्त माणसाकडे जाणार आहे . गाडगेबाबा : स्वर्गात व्यवस्थित पोहोचते काजी ?
भटजी : हो तिथे हे पिंड पोहोचले की त्या मृताच्या आत्म्याला शांत होते .त्याची भूक मिटते. गाडगेबाबा : किती दूर आहे स्वर्ग ?
भटजी : खूप दूर आहे .
गाडगेबाबा : तरीपण किती दूर? मुंबई इतका दूर का दिल्ली इतका दूर .
भटजी : त्याहीपेक्षा दूर हे अध्यात्म आहे तुमच्यासारख्या वेडपट माणसाला ते नाही कळणार ? यासाठी अध्यात्म समजले पाहिजे. भटजीचे हे तकलादू तत्वज्ञान ऐकून गाडगेबाबा बाजूला गेले .नदीच्या पात्रात उभे राहून आपल्या हाताच्या ओजडीने पाणी फेकायला त्यांनी सुरुवात केली. पाणी भटजीच्या अंगावर गेल्याने भटजी प्रचंड चिडला.
भटजी : का पाणी फेकतो वेड्या अंगावर ?
गाडगेबाबा : अंगावर नाही फेकत जी , वावराले पाणी देऊन राहिलो.
भटजी : कुठे आहे तुझे वावर ? गाडगेबाबा : आहे वऱ्हाडात मुर्तीजापुर जवळ दापूरले .
भटजी : इतक्या दूर असलेल्या तुझ्या शेतात इथून पाणी कसे बरे पोहोचेल ?
गाडगेबाबा : तीनशे-चारशे मैल तर दूर आहे वावर.
मले वाटलं दिल्लीपेक्षा दूर असलेल्या हजारो किलोमीटर दूर असलेल्या, स्वर्गात तुमचा हा द्रोनातला भात पोहोचते तर मी फेकलेले पाणी का नाही पोचणार माया वावरात . संत गाडगे बाबाच्या या युक्तिवादाने भटजीचे अध्यात्म नेस्तनाबूत झाले .हा बुद्धिप्रामाण्यवादी संत गाडगे बाबा महाराष्ट्राला एक नवी दिशा त्या काळात देत होता. मात्र आज रोजी विज्ञानाने एवढी प्रगती करून सुद्धा समाजातील उच्चशिक्षित लोक आजही गाडगे बाबा चा विचार समजून न घेता अंधश्रद्धेला बुवाबाजीला आपल्या कृतीतून खतपाणी घालताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा लोकांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून हुंडाबळी , जातीयता ,अंधश्रद्धा ,दैववाद, व्यसनाधीनता यावर प्रचंड प्रहार केला. तर बहुजन समाजात शिक्षणाविषयी जनजागृती केली. नदीला घाट बांधले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरिबांना मदत केली . संत गाडगेबाबांनी मानवी जीवनाचे कल्याण होण्यासाठी दशसुत्री सांगितलेला संदेश आजचा खरा रोकडा धर्म आहे .
ही दशसूत्री अशी होती. १) भुकेला अन्न द्या. २) तहानलेल्यांना पाणी द्या.३) उघड्या नागड्या यांना वस्र द्या. ४) बेघरांना आसरा द्या. ५ ) गरीब मुला-मुलींना शिक्षण द्या. ६) अंध अपंग रोग्यांना औषध उपचार द्या.७) सुशिक्षित बेकारांना रोजगार द्या .८)पशुपक्ष्यांना मुक्या प्राण्यांना अभय द्या .९) दुखी व निराशा यांना हिम्मत द्या. १०) गरीब तरुण-तरुणींचे लग्न जुळून आना अशीही दशसूत्री मानवी कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारी आहेत . अगदी सोप्या पद्धतीने देव आणि धर्म कसा शोधायचा हे संत गाडगेबाबांनी या सूत्रातून समस्त मानव जातीला सांगितले आहे. खर्या अर्थाने गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा हा विचार प्रत्येक व्यक्तीने अंगीकारले पाहिजे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल अशा या प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला विचाराला कोटी कोटी विनम्र अभिवादन
– सिद्धार्थ अशोक तायडे
मु .पो वडनेर भोलजी
ता .नांदुरा जि. बुलढाणा
मो. नं. ९३०९७६७३८८