
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- ईडी’कडून सुरू असलेल्या कारवायांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्रातील भाजप सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून दररोज केला जात आहे. ईडी’ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संर्घष विकोपाला गेला आहे. याच मुद्द्यावर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोजक्याच वाक्यात उत्तर दिलं. अर्थसंकल्पा सादर झाल्यानंतर पहिल्यादांच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली.
यावेळी त्यांनी एनएसई, चित्रा रामकृष्ण आणि हिमालयी बाबा, त्याचबरोबर ईडीच्या कारवायांबद्दल विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. ईडीच्या कारवायांबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, “कोणताही गुन्हा घडल्याशिवाय ईडी त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याची एक दीर्घ प्रक्रिया आहे. ईडी केवळ विरोधक आहेत म्हणून मागे लागत नाही. आधीच तपासात असलेला आणि पीएमएलए कायद्याशी संबंधित गुन्हा असेल. त्यामुळे माझी इच्छा असली, तरी मी या तपासात हस्तक्षेप करू शकत नाही किंवा तपास थांबवू शकत नाही,” असं सीतारामन म्हणाल्या.