
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- काही घटक हे नाराज होतील. आरोप करत बसतील. त्याकडे फार लक्ष देऊ नका. लोकांच्या कामाला गती द्या, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. आज मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकासाच्या कार्यक्रमात बोलत होते. गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता आणि यात गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मंत्री अस्लम शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे उपक्रम घेण्याचे शक्य आहे तिथे नक्की हे उपक्रम घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊन नका, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीमागे उभी राहतील, असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच घर या लहान गोष्टी नाही, निवास हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बीडीडी चाळीचा विषय मुंबईसाठी महत्त्वाचा होता. त्याचे अनेक वेळा भूमिपूजन झाले. पण निर्णय काही झाली नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी जबाबदारी हातात घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन काम आता मार्गी लागले आहे, असं म्हणत शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले.