
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
-महावितरण कृषी धोरणातून ग्रामविकास व थकबाकी मुक्तीची संधी
-जिल्ह्यातील ५ हजार ८१२ शेतकरी वीज बिलातून झाले थकबाकीमुक्त
अमरावती :- महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या ‘कृषी धोरण’ प्रक्रियेनुसार ५ हजार ८१२ शेतकरी वीज देयक थकबाकीमुक्त झाले आहेत.या धोरणात ३१ मार्च २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना एकूण थकबाकीच्या ६६ टक्के माफी मिळणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
प्राप्त निधी ग्रामविकासासाठीच वापरणार
शासनाच्या “कृषी धोरण २०२०”अंतर्गत वसूल होणाऱ्या वीजबिलाच्या ६६ टक्के निधी स्थानिक पातळीवरील ऊर्जा विकास कामासाठीच वापरण्यात येत असल्याने या धोरणातून ग्रामविकास साधता येणार आहे.एकून वीज देयकात ६६ टक्के सवलत असल्याने थकबाकीदार शेतकरी बांधवांना केवळ ३४ टक्के थकित रक्कम भरून वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे.जिल्ह्यातील ४१ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत थकबाकी मुक्तीकडे वाटचाल केली आहे.आतापर्यंतच्या प्रक्रियेनुसार ५ हजार ८१२ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.
या प्रक्रियेतून वीज सुविधा विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकणार आहे.या निधीतून नवीन रोहित्र बसवणे,रोहित्राची क्षमता वाढ, नवीन वीज वाहिनी उभारणे,नवीन कृषी पंप जोडणी देणे,नविन उपकेंद्र उभारणे तथा वीज यंत्रणा सक्षम करणे आदी कामे करता येणार आहेत.या प्रक्रियेचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अँड.यशोमती ठाकूर यांनी केले.
सौर कृषी वाहिनी योजनेत अनेक प्रकल्प प्रगतीपथावर
ऊर्जा ही विकासाची जननी असल्याने मागेल त्याला वीज देण्याचा शासनाचा मानस आहे.याचाच भाग म्हणून गत दोन वर्षात जिल्ह्यात विविध वर्गवारीतील ४१ हजार ३३४ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत जिल्ह्यात १ हजार ६१० कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत असून या योजनेत सौर प्रकल्प उभारून त्या प्रकल्पातून शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन आहे.आतापर्यंत जिल्ह्यात बडनेरा १.४ मेगावॅट,नांदगाव खंडेश्वर १.३ मेगावॅट,लेहगाव १.० मेगावॅट आणि डाबका १.२ मेगावॅट येथे एकून ४.९ मेगा वॅटचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून सांभोरा (चांदूर बाजार) ५ मेगावॅट व सोनगाव (चांदूर रेल्वे) ५ मेगावॅटचे काम प्रगतीपथावर आहे.
महावितरणकडून यापुढेही अधिकाधिक लोकाभिमुख कामे व्हावीत.कृषी पंपाच्या वीज देयकात ग्राहकांना शंका असल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे.आवश्यक दुरुस्ती करून द्यावी.वीज सेवा अधिक सक्षम,लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.