दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधि
अनंता टोपले
जव्हार :- जव्हार तालुक्यात एका १९ वर्षीय आदिवासी तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जव्हार तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या तरूणीवर दोघांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दोघा जणांनी रविवारी तरूणीवर बलात्कार केला. आरोपींनी तरूणीला शेतातील गोदामात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित तरूणीला धमकावले. याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली.
आरोपींनी धमकावल्यानंतर पीडित तरूणी प्रचंड घाबरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही. मात्र, तिला या घटनेनंतर प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पीडितेची अवस्था बघून कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडितेने कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
कुटुंबीयातील सदस्यांनी तात्काळ या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.