
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा
मुंबई :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यासह देशातील राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे मत ममता यांनी व्यक्त केले असून, या मुद्द्यावर स्वतः राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना दिले आहे.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात जवळपास 10 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी अनेकदा म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या मुंबईतील घरी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. दरम्यान, अटकेनंतर मी लढेन, घाबरणार नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.