
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
हालसी (तू.) ता.२३ :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील तांड्या वस्तीवर असलेल्या तीस बालकवींच्या कवितांनी हे ग्रामीण कविसंमेलन अभूतपूर्व असे रंगले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाराष्ट्र विद्यालय, राजमुद्रा प्रतिष्ठान हालसी (तू.) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, मराठी राजभाषा दिन व शिवजयंती उत्सव सप्ताह निमित्ताने घेण्यात आले होते.
यात जि. प. प्रा. शाळा हलसी, महाराष्ट्र विद्यालय हालसी, सरकारी उच्च प्राथमिक शाळा अट्टरगा, स्वामी विवेकानंद हायस्कूल मेहकर, जि. प. प्रा. शाळा चिचोंडी, डॉ. शिवाजीराव पाटील विद्यालय हलगरा यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
मुस्कान मुल्ला, शांभवी जांभळीकर, लक्ष्मी बंडगर, सविता सागावे, ऋतुजा बनसोडे, जय कांबळे, रोळे श्रद्धा अशा अनेक विद्यार्थ्यांनी जिंदगी, आई-बाबा, शाळा, गुरुजी, सबला, स्त्री, मैत्री अशा अनेकविध वैविध्यपूर्ण एकापेक्षा एक सुंदर कवितांचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कविता सादर करताना कवी- प्रताप जाधव यांनी ‘या लातूर जिल्ह्याला’ ही गाजलेली कविता गाऊन सादर केली व प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या या बाल कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करताना प्रदेश संघटक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे कवी, सतीश हानेगावे यांनी ‘भ’ भटजीचा की ‘भ’ भाकरीचा ही काळजाला हात घालणारी आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण करणारी कविता सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळविली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने ज्यांना महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ. सरोजिनी बाबर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते, अशा चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, शांता गिरबणे यांनी ‘तेजाची शलाका’ ही स्त्रीप्रधान कविता सादर करून अनेक महिलांना सबल, सशक्त व समृद्ध बनण्याचा जिजाऊ -सावित्रीचा मानवी जीवन उजळवून टाकणारा, तेजाचा वैचारिक वारसा कवितेच्या माध्यमातून सांगितला.
या बाल कवींच्या कवी संमेलनाच्या समारोपाच्या नंतर कु. मुस्कान मुल्ला लिखित ‘अंकुर’ या अत्यंत दर्जेदार काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी अनंत चंपाई माधव कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना शिक्षक नेते अरुण सोळुंके, केंद्रप्रमुख सूर्यकांत तेलंग, साधन व्यक्ती प्रवीण गिरी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी कवयत्रीचे तोंड भरून कौतुक केले. हिंदी भाषा असतानाही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या या कवयत्रीने खऱ्या अर्थाने अंकूर या काव्यसंग्रहाला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.
या बाल कवयत्रीच्या काव्यसंग्रहाला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या सार्या कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यापक शिवराज गोसावी, कवी आनंद कदम या टीमचे कौतुक करून या विधायक कार्यक्रमासाठी भरपूर परिश्रम घेतल्याबद्दल त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या कार्यक्रमाला केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध शाळेतील विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.