
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात दाखल व दाखलपूर्व असे प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.नागरिक तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.जोशी यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक अदालतीचे कामकाज प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पध्दतीनेही होणार आहे. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा.
तसेच (दाखलपूर्व ) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याशी संपर्क साधावा.मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दिनांक ७ ते ११ मार्च २०२२ या कालावधीत यासंबंधी विशेष मोहीम (Special Drive) राबविण्यात येणार आहे अशी माहिती अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर.पाटील यांनी केले आहे.