
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
बेंगळुरुनंतर अन्य भारतीय शहरांमध्येही आता जीआयए म्हणजेच जागतिक नवोन्मेष संघटनेच्या केंद्रांची स्थापना सिंगापूर करणार- एस.ईश्वरन
नवी दिल्ली :- अठ्ठाविसाव्या डीएसटी-सीआयआय भारत-सिंगापूर तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) डॉ.जितेंद्र सिंग यांनी, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत भारताबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. कारखानदारी उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणुकींसाठी आता भारत हे एक आकर्षक केंद्र ठरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाटचाल करताना आता नवोन्मेषी अर्थव्यवस्थेच्या युगासाठी भारत स्वतःला तयार करत आहे. शासकीय अनुदानातून काम करणाऱ्या बाराशेहून अधिक संशोधन संस्था, विचारपूर्वक आणि वेळेवर धोरणे आखण्याची यंत्रणा, उद्योगजगत आणि शिक्षणक्षेत्रातील समन्वय आदी घटक यासाठी साहाय्यभूत ठरत आहेत, असे डॉ सिंग म्हणाले. भारतात सातत्याने नवोन्मेष आणि अभिनव संकल्पनांची कमान चढती असल्याचे दिसून येत आहे. ब्लॉकचेन, नॅनोतंत्रज्ञान, क्वांटम कम्प्यूटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी उगवत्या तंत्रज्ञानांना अभिनव संकल्पनांच्या क्षेत्रात मध्यवर्ती स्थान मिळत असल्याने पहिल्या 25 नवोन्मेषी देशांमध्ये स्थान मिळवण्याची आकांक्षा भारताच्या मनात आहे, असेही ते म्हणाले.
एनएसएफच्या माहितीनुसार, वैज्ञानिक प्रकाशनांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, तर जीआयआय म्हणजे जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या बाबतीत भारताने पहिल्या पन्नास देशांत स्थान (भारताचा क्रमांक 46) पटकावले आहे. पीएचडी संपादन केलेल्या व्यक्तींच्या संख्येचा विचार करता भारत तिसऱ्या स्थानावर आहे. देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेचे आकारमान आणि स्टार्टअप उद्योगांची संख्या या बाबतींतही भारताचा तिसरा क्रमांक लागतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेमध्ये (आसिआन) सिंगापूर हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून, भारतात थेट परकीय गुंतवणूक करणारा तो आघाडीचा देश आहे, असेही सिंग हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय, सक्षमीकरण, सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता ही उद्दिष्टे गाठण्यासाठी एक माध्यम म्हणून तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून घेणे भारताला शक्य होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांत आणि सर्व वंचितांपर्यंत सेवा पोहोचवता येण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा डोळस वापर करत असल्याचेही ते म्हणाले.
आज मूर्त स्वरूपात आलेल्या सामंजस्य करार आणि अंमलबजावणी करार यांमुळे भारत आणि सिंगापूरदरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याबाबतचे सहकार्य वृद्धिंगत होईल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला. उभय देशांतील उद्योग आणि संशोधन संस्थांना, आर्थिक-सामाजिक आव्हानांवर तोडगा काढणाऱ्या गोष्टी एकत्रितपणे तयार करता येण्यासाठी या करारांची मदत होईल, असेही डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. या तंत्रज्ञान शिखर परिषदेत सिंगापूरचे परिवहन मंत्री आणि व्यापार संबंधाविषयक कामकाजाचे प्रमुख मंत्री एस.ईश्वरन यांनीही मनोगत व्यक्त केले.
“उभय देशांतील द्विपक्षीय व्यापार, 2020 ते 2021 या काळात 35% नी वाढला असून 19.8 अब्ज डॉलरवरून 26.8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे”, असे ईश्वरन म्हणाले. सिंगापूरने बंगळुरूमध्ये जीआयए म्हणजेच जागतिक नवोन्मेष संघटनेचे केंद्र उभारले आहे. त्याचा संदर्भ देऊन ईश्वरन यांनी, ‘लघु आणि मध्यम उद्योगांना तसेच स्टार्टअप्सना प्रगती करून घेण्यासाठी अशी आणखी काही केंद्रे भारताच्या इतर शहरांमध्ये उभारली जातील’ अशी ग्वाही दिली. ‘या उद्योगांना आशियासह जगभरात काम करण्यासाठी सिंगापूरचा आधार घेऊन झेप घेता येईल’, असा विश्वासही ईश्वरन यांनी व्यक्त केला.