
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 87 हजार 545 बालकांचे होणार पल्स पोलिओ लसीकरण होणार आहे. यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून या वयोगटांतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात 986 बुथवर 73 हजार 395 बालकांना तर शहरी भागाकरीता 108 बुथवर 14 हजार 150 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 87 हजार 545 लाभार्थींकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र मिळून एकुण 1094 बुथची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक बुथवरील कामकाजाचे पर्यवेक्षण करण्याकरीता 212 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विटभट्टी, ऊस तोडणी कामगार, स्थलांतरीत वसाहती यातील बालके लसीकरणापासून वंचित राहु नये. याकरीता 52 मोबाईल टिमची तसेच बस स्थानक, रेल्वे स्थानक, टोल नाके इत्यादी ठिकाणी 63 ट्रान्झिंट टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनंतर ग्रामीण भागात 3 दिवस (दि.28 फेब्रुवारी, 2 व 3 मार्च) तर शहरी भागात 5 दिवस (दि.28 फेब्रुवारी, 2, 3, 4 व 5 मार्च) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन (IPPI) सुटलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरीता ग्रामीण व शहरी भागातील 2 लाख 97 हजार 784 घरांना 978 टिम मार्फतीने भेटी देऊन सुटलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. 978 टिमचे पर्यवेक्षण करण्याकरीता प्रती 5 टिममागे एक पर्यवेक्षक याप्रमाणे 606 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, जनजागृती साहित्य वाटप जिल्हास्तरावरुन करण्यात आले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरुन पर्यवेक्षणाकरीता जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांना तालुक्यातील सर्व बुथचे पर्यवेक्षण करण्याकरीता नियुक्त करण्यात आले आहे. कोविड-19 नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करुन घेण्यात यावे, असे आवाहन डॉ. मिलिंद सोमकुवर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.