
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
इंद्रसिंग वसावे
अक्कलकुवा :- राष्ट्रीय पोलिओ निमुर्लन कार्यक्रमातंर्गत रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी नंदूरबार जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजीत करण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी लागणारी बायोव्हलेंन्ट पोलिओ लस २ लाख 61 हजार प्राप्त झाली आहे. शितसाखळी अबाधित ठेऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना लस पोहोचविण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार 162 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. मोहिमेसाठी २ हजार 2 लसीकरण केंद्राचे नियोजन केले असून प्रत्यक्ष बुथवर डोस देणे, बालकांना बोलावुन आणणे यासाठी 4 हजार 853 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
या मोहिमेचे 502 अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून जिल्ह्यातील ६ तालुक्यांचे पर्यवेक्षणासाठी स्वंतत्र 6 अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत महत्वाचे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट या ठिकाणासाठी 66 ट्रान्झीट टिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भटके कामगार, विटभट्टी, उसतोड कामगार, रोड कामगार यांचे बालकांना पोलिओ देण्यासाठी ८७ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयातंर्गत 162 वैद्यकीय अधिकारी यांनी मोहिमेचे नियोजन केले आहे.
या मोहिमेची नागरीकांना माहिती होण्यासाठी गावात दवंडी देणे, प्राथमिक केंद्राच्या वाहनावरुन कार्यक्षेत्रात प्रचार करण्यात येणार आहे. गावातील ग्रामपंचायत, शाळा, सहकारी सोसायटी यांचे फलकावर मोहिमेची ठळक प्रसिध्दी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी असणाऱ्या उद्घोषणा केंद्रावरुन बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी लाभार्थी लसीकरण स्लिप वाटप करण्यात आले असून या मोहिमेत जिल्ह्यातील नागरीकांनी सक्रिय सहभाग देवुन पाच वर्षांच्या आतील प्रत्येक बालकास पोलिओ डोस पाजुन घेण्याचे आवाहन पल्स पोलिओ समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री.
सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ संजीव वळवी , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नारायण बावा यांनी केले आहे.