
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
अ.दि.पाटणकर
पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्या शिवमंदिरात आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन केला त्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र रायरेश्वराच्या मंदिराविषयी अनेक इतिहासप्रेमी शिवभक्तांना आस्था आहेच पण त्याचबरोबर रायरेश्वराच्या विस्तीर्ण अशा पठारावरील अप्रतिम निसर्ग सौंदर्यही अनेक शिवभक्तांसह पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यातच आता याच निसर्ग सौंदर्याने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील शिवरायांची भुमिका अजरामर करणारे अभिनेते शंतनु मोघे आणि त्यांच्या पत्नी आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील गोदावरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मोघे -मराठे यांनाही भुरळ पाडली आहे.
सतत धावणाऱ्या आणि घाईगर्दीत हरविलेल्या आयुष्यासाठी प्रत्येक जन थोड्या विश्रांतीची जागा शोधत असतो अगदी तशीच जागा असलेल्या आणि इतर पर्यटन स्थळांच्या प्रमाणात अत्यंत कमी गर्दी असणाऱ्या रायरेश्वर येथे जाण्यासाठी शंतनु मोघेंना त्यांचे मित्र गौरव पाथरकर यांनी विशेष मदत केली. आणि त्यानुसार नुकतेच स्वतः मोघे आणि त्यांच्या पत्नी प्रिया हे आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे मुक्कामी गेले होते शहरांपासून काही दूर असलेल्या रायरेश्वर या मोजक्या लोकवस्तीच्या ठिकाणी केलेली मौजमजा त्यांनी फोटोंच्या माध्यमातुन सोशल मीडयाद्वारे शेअर केली आहे.
त्यामध्ये शिवमंदिरात नतमस्तक होताना,मंद चंद्रप्रकाशातील बोचऱ्या थंडीत शेकोटी शेजारी बसून गप्पा गोष्टींमध्ये आनंद घेताना, स्थानिक जंगम कुटुंबाच्या दगड-मातीच्या आणि शेणाने सारवलेल्या घरात भारतीय बैठकीत जमीनीवर बसुन पंगतीमध्ये चुलीवरच्या गरमागरम झुणका भाकर खाण्याचा आस्वाद घेताना, जिकडे पहावे तिकडे फक्त आणि फक्त आकाशच दिसणाऱ्या विस्तीर्ण पठारावर तंबुतील मुक्काम अशा अनेक आठवणी फोटोव्दारे शेअर केल्या आहेत. यावेळी रायरेश्वर येथील निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण आणि अविस्मरणीय आठवणींची मांडणीही मोघे यांनी अतिशय कमी शब्दात परंतु प्रभावीपणे केली आहे ते लिहतात.
” शहरापासून दूर, प्रदूषण-मुक्त, गुलाबी थंडी, गार वारा,डोंगर -दऱ्या,हिरवी कंच झाडी,चुलीवरचा झुणका भाकर,तंबूतली ऊब, धुक्याचा ओलावा,शेकोटी, निरभ्र आकाश, पौर्णिमेचा चंद्र,डोळयांसमोर सूर्योदय, जिवाभावाचे सोबती…. अहाहा… जंगम परिवाराचे आदरातिथ्य, मनसोक्त गप्पा,… माहोल… चंद्र प्रकाशाच्या शीतलतेचा पांघरूण ओढून लागलेली शांत झोप आणि सूर्योदयाच्या किरणांच्या आणि पाखरांच्या किलबिलाटाच्या गजरानी आलेली टवटवीत जाग….. निसर्गाची जादूगारी… केवळ भुरळ घालणारी.”
आजवर खुप सेलिब्रिटी,राजकारणी आणि शासकीय अधिकारी यांनी या पर्यटन स्थळाला भेट दिली परंतु अशा पध्दतीने तेथील निसर्गाचा आनंद घेणारी पहिलीच सेलिब्रिटी जोडी ठरल्याचा मान श्री व सौ मोघे यांनाच मिळाला.