
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारताचा माजी यष्टीरक्षक आणि महान कर्णधार एमएस धोनी याला भेटण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. केवळ भारतच नव्हे तर परदेशातील क्रिकेटपटूही त्याच्याकडून धडे घेण्यासाठी उस्तुक असतात. २०२१ साली संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक होता. यावेळी भारतीय संघाचा मार्गदर्शन करण्याबरोबर तो इतर देशांच्या खेळाडूंसोबत आपले अनुभव आणि ज्ञान वाटताना दिसला होता. यादरम्यान त्याची भेट पाकिस्तानच्या युवा गोलंदाज शाहनवाज दहानी याच्यासोबत झाली होती. आता या भेटीबद्दल दहानीने प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीला भेटून आपले आवडत्या भारतीय क्रिकेटपटूला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे दहानीने म्हटले आहे. याबद्दल क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना दहानी म्हणाला की, “मला तुम्हा सर्वांना धोनीच्या पातळीबद्दल समजावून सांगण्यासाठी खूप वेळ लागेल. त्याला भेटणे, एक मोठे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. मी त्या क्षणाला कधीही विसरू शकणार नाही. त्याचे शब्द खूप फायदेशीर होते. कारण त्याने मला जिवनाबद्दल सांगितले. जीवन कसे जगायचे, मोठ्यांचा सन्मान करायचा, अशा गोष्टी त्याने मला सांगितल्या.”
तसेच क्रिकेटमधील आव्हानांबद्दल बोलताना धोनी मला म्हणाला की, क्रिकेटमध्ये चांगले आणि वाईट दिवस येत राहतात. परंतु आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. आव्हानांचा स्विकार करून त्याना पूर्ण केले पाहिजे. ज्या खेळावर आपण सर्वाधिक प्रेम करतो, त्या खेळाप्रती समर्पित राहिले पाहिजे,” असे दहानी पुढे म्हणाला.