
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
रश्मी शुक्ला या भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह हे देखील याच तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीरसिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेतही शुक्ला यांच्या नावाचा उल्लेख केला होता. परमबीरसिंह यांचे निलंबन झाले असून, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राला पाठवली आहे.
तसेच, त्यांच्यावर खंडणी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या बॅचच्या रश्मी शुक्ला या अडचणीत आल्या आहेत.
पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्ला व त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय तार अधिनियम कायद्यातील कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्ला या सध्या हैद्राबादमध्ये प्रतिनियुक्तीवर असून, त्यांच्यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरीक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी आहे. शुक्ला यांची पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर त्यांना राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (एसआयडी) आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. याच काळात हे फोन टॅपिंग प्रकरण घडले होते.