
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात फोन टॅपिंगचे प्रकरण चर्चेत आहे. काही राजकीय नेत्यांनी फोन टॅप केल्याचे आरोप केले होते. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंगसंदर्भात मोठे खुलासे केले आहेत. राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅब केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग संदर्भात धक्कादायक खुलासे करताना, रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया फॉलो न करता फोन टॅपिंग केल्याचा खुलासा गृहमंत्र्यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याची माहिती दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे.
नाना पटोले यांच्या नावासमोर अमदज खान, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर आणि आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंखे असं दाखवण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, फोन टॅप करायचे असल्यास कायद्यानुसार सार्वजानिक सुरक्षा, दहशतवादी कृती आणि परराष्ट्र संबंध या कारणांसाठी फोन टॅप करता येतात.
शुक्ला दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शुक्ला यांच्यावर सुड भावनेतून कारवाई केलेली नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हा पोलिसांचा भाग आहे असून ते तपास करतील, असंही दिलीप वळसे पाटलांनी म्हणाले आहेत.