
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारताच्या महिला हॉकी संघाने प्रो-हॉकी लीगमध्ये विजयी वाटचाल कायम राखली आहे. या स्पर्धेत भारताने स्पेनवर 2-1 असा विजय मिळवताना सलग तिसरा विजय प्राप्त केला. भुवनेश्वर येथील किलगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारताला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्पेनचा बचाव भेदण्यात यश येउनही गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आक्रमक खेळ सुरु केला व 18 व्या मिनिटाला 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यांचा हा गोल मार्ता सेगूने केला.
मात्र त्यांची आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. 20 व्या मिनिटाला ज्योतीने गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या हाफमध्ये यजमान भारताला गोल करण्याच्या संधी मिळाली नाही. चौथ्या हाफमध्ये भारताने बचाव जास्त आक्रमक केला. त्याचवेळी भारताची स्टार खेळाडू वंदना कटारियाने 52 व्या मिनिटाला मारलेला फटका स्पेनची गोलरक्षक ऍबना कॅल्व्होने रोखला पण चेंडू नेहाकडे गेला व तिने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर नेहाचा हाच गोल निर्णायक ठरला.