
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारताच्या महिला बॉक्सर निखत झरीन (५२ किलो) आणि नितु (४८ किलो) यांनी कमालीच्या सातत्याने खेळ करत ७३व्या स्ट्रांजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा बल्गेरियाता सोफिया येथे सुरू आहे. नितूचा धडाका अंतिम फेरीतही कायम होता. तिच्या आक्रमक ठोशांचा इटलीची एरिका प्रिसिआंड्रो सामना करू शकली नाही. त्यामुळे जज्जेसनांही नितुच्या बाजूने ५-० असा निकाल देताना फारसे प्रयास पडले नाहीत.
दुसऱ्या लढतीत युवा जागतिक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती निखत हिने युक्रेनच्या तीन वेळच्या युरोपियन विजेत्या टेटिआना कॉब हिच्यावर वर्चस्व राखले. जज्जेसने निखतच्या बाजूने ४-१ असा कौल दिला. नितूचे थेट आक्रमण जबरदस्त होते. आपल्या उंचीचा फायदा घेऊन तिने छान पंच मारले. निखतने आपले पदलालित्य सुरेख राखून प्रतिस्पर्धीस बेजार केले.
दोघींनी आपल्या नेहमीच्या शैलीविरुद्ध खेळ केला. त्यांची कामगिरी जबरदस्त झाली. नितूने प्रतिआक्रमणावर दिलेला भर कौतुकास्पद होता. निखतला कमी अधिक प्रमाणात झुंज द्यावी लागली. तिचे पदलालित्य झकास होते, अशी प्रतिक्रिया महिला संघाचे प्रशिक्षक भास्कर भट्ट यांनी व्यक्त केली. निखतने यापूर्वी २०१९ मध्येही या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.