
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- तेलंगणा आणि कर्नाटकाच्या काठावर असलेल्या देगलूर तालुक्यातील खेड्यापर्यंत विकासाचे मार्ग पोहचावेत, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा हा व्यापक दृष्टिकोण महाविकास आघाडी शासनाने बाळगलेला आहे. या गावातील जनतेला अधिक चांगला न्याय देता आला पाहिजे ही आमची भूमिका आहे. यादृष्टिने सर्व विकास कामांचे नियोजन केले जात असून तब्बल ३८० कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
देगलूर येथील अधिका-यांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थान व शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ.अमर राजूरकर, जिप अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ.जितेश अंतापूरकर, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, मुख्य अभियंता बसवराज पांढरेआदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड येथून हैद्राबादकडे जाण्यासाठी आजच्या घडीला ५ तास लागतात. या अंतरात मोठे शहर व महत्वाचा टप्पा म्हणून देगलूरकडे पाहिले जाते.
हे लक्षात घेता देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि मोठ्या स्वरुपातले विश्रामगृह व्हावे याबाबत नियोजन केले होते. देगलूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने हे काम युद्धपातळीवर लवकर पूर्ण करण्यात आले. आता या नवीन वास्तू तेवढ्याच अधिक स्वच्छ आणि चांगल्या ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित अधिका-यांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी ना.चव्हाण यांच्या हस्ते शहरातील अत्याधुनिक अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकाचे उद्घाटन करण्यात आले.