
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील आष्टा गावातील विद्युत वाहक तारा जुनाट असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आष्टा ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी तेथील उप कार्यकारी अभियंता यांना रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात महावितरणकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या.
घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले. परंतु आजतागायत ही समस्या सोडविण्यात महावितरणने स्वारस्य दाखविले,पण गुत्तेदार मार्फत जुनाट विद्युत वाहक तरा बदलण्याचं काम संथ गतीने चालू आहे. त्यामुळे दिवस-रात्र चाललेल्या विजेच्या लपंडावामुळे त्याचा त्रास अबाल-वृद्धांना होत असतो. विशेषतः या भागातील आजारी व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे.
आष्टा गाव वार्ड नंबर २ आणि पट्ट्यातील महावितरणच्या विद्युत वाहक तारा जुनाट आणि कुचकामी झाल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अशा सडक्या केबल तुटून वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. शहर आणि ग्रामीण असा दुजाभाव न करता महावितरणने आष्टा आणि परिसरातील रहिवाशांना नेहमीच भेडसावणारा हा प्रश्न निकाली काढावा, अशीही मागणी आष्टा येथील रहिवाशांनी केली आहे.