
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
बलिया :- फेफणा विधानसभा मतदारसंघातील एका निवडणूक सभेला संबोधित करताना यादव म्हणाले, भाजपने किती वेळा आपली फसवणूक केली हे बलियाच्या लोकांना माहीत आहे. त्यांनी तुमची इतकी फसवणूक केली आहे की, ही निवडणूक आता ‘छलिया’ विरुद्ध बलिया अशी झाली आहे. भाजपच्या भागीदारांनाही त्यांचा खोटेपणा कळाला आहे असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे सरकार देशातील शेतकऱ्यांचे सन 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट करणार होते. आज उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच पण शेतकऱ्यांना साधी खतेही बाजारात मिळेनाशी झाली आहेत अशा स्थितीत शेतकरी शेती तरी कशी करणार आणि त्यांना उत्पन्न कोठून मिळणार असा सवाल करीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथील प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
बलियाच्या जनतेने राजकारणाला नेहमीच नवी दिशा दिली आहे. ही काही सामान्य निवडणूक नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही निवडणूक आहे. आज या कामात समाजवाद्यांबरोबरच आंबेडकरवादीही जोरदारपणे सहभागी झाले आहेत त्यामुळे येथे भाजपला पराभवापासून कोणीही वाचवू शकत नाही असे ते म्हणाले. आपला पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच बेरोजगारीच्या प्रश्नावर उपाययोजना केली जाईल असे ते म्हणाले.