
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
ठाणे :- भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत असून, भाजप देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या कठीण काळात देशाचे पंतप्रधान हे पाच राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याची टीका यावेळी पटोले यांनी केली. ते ठाण्यात महाराष्ट्र प्रदेश ओबीसी (obc) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅली काढण्यात आली होती.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना इतर देशांनी आधीच मायदेशात आणले. मात्र, मोदींना उशिराने जाग आली, अशी टीका पटोले यांनी केली. आता उशीर झाला असला तरी देखील ही सर्व मुले सुरक्षित भारतात यावीत, ही काँग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष राहूल पिंगळे उपस्थित होते.
दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, यासाठी निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सरकारने त्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, एखाद्याने टीका केली तर त्याच्या विरोधात व्यक्तिगत कारवाई करणे हे लोकशाहीला न परवडणारे आहे. भाजपने या ब्लॅकमेलींगच्या धंद्यातून बाहेर या. भाजप सरकारला सत्तेचा माज आहे. तो कमी करावा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिला.