
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या भागतील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले आहे. राज्य कार्यकारी समितीची 25 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार 4 मार्च 2022 मध्यरात्री 12.00 पासून केली जाणार आहे. हे निर्देश पुढील आदेशांपर्यंत अमलात राहणार आहे.
व्यक्तीचे ‘पूर्ण लसीकरण’ याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सगळी मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.