
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी केलेल्या विधानावरून ते अडचणीत आले आहेत. यातच आता नितेश राणे यांनी थेट न्यायालयासमोरच दिशाच्या मृत्यूबाबत पुरावे सादर करण्याची भूमिका घेतली आहे.
दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी नारायण राणे यांना 4 मार्च, नितेश राणेंना 3 मार्चला चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
मालवणी पोलीस ठाण्याने बजावलेल्या समन्सवर बोलताना नितेश राणे यांनी थेट न्यायालयासमोर पुरावे सादर करण्याची भूमिका घेतली. ते म्हणाले की, आम्हाला पोलिसांच्या नोटिसा आज मिळाल्या आहेत. आम्ही त्याला योग्य उत्तर देणार आहोत. दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबत आम्ही अनेक पुरावे न्यायालयात सादर करणार आहेत. दिशाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.