
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- सरलेल्या 2021- 22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील घर विक्री विविध कारणामुळे वाढली आहे. त्यामुळे या वर्षात घर विक्रीतून महाराष्ट्र सरकारला मिळालेला महसूल विक्रमी पातळीवर जाणार असल्याचे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये घराची विक्री आणि नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक एप्रिल 2022 पासून महाराष्ट्रामध्ये घर विक्री वर एक टक्क्याचा सरचार्ज लागणार आहे. त्यामुळे एक एप्रिलच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात घर खरेदी करण्याची शक्यता असल्याचे ऍनारॉक समूहाने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
एप्रिल 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रातून विकल्या गेलेल्या घरावर सरकारला 5,671 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. त्यामुळे या वर्षात कर संकलन 63 टक्क्यांनी वाढले आहे. या अगोदर आर्थिक वर्ष 2018 मध्ये 5,878 कोटी रुपयाचे कर संकलन झाले होते. चालू वर्षात उरलेल्या एक महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर विक्री होऊन 2018 चा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. अनारॉक संस्थेच्या संशोधन विभागाचे प्रमुख प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 कालावधीमध्ये मुद्रांक शुल्क दोन टक्क्नी कमी केले होते. त्यामुळे या कालावधीत घर विक्री वाढली होती.
आता महाराष्ट्र सरकारने एक एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करण्याचे जाहीर केल्यामुळे मार्च महिन्यामध्ये घर खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रयत्न करीत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. रोजगारनिर्मिती वाढली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये कुंपणावर बसून राहिलेले ग्राहक मार्च महिन्यामध्ये घर खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 2021- 22 मध्ये कार्यालयाच्या जागेसाठी ही बरीच लीजिंग आणि खरेदी झाली असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.