
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
“स्त्री ही समाजाची एक प्रमुख घटक आहे”,तोच घटक पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे हे लक्षात घेऊन समाजाचे आरोग्य नीट राखायचे असेल तर अचूक निदान व अचूक उपाय आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन स्त्रीविषयक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, स्त्रियांना आपल्या अस्मितेची जाणीव करून दिली पाहिजे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, स्त्रीवर होत असलेले अन्याय दूर केले पाहिजेत यामुळेच तर हा लेखन प्रपंच …
स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबा शिवाय समाज नाही. सासर व माहेर हे दोन्ही जोडण्याचे महत्त्वाचे काम स्त्रीच करू शकते. हे त्रिकाल सत्य आहे.
8 मार्च हा दिवस महिलांसाठी सन्मानाचा,अभिमानाचा आणि आनंदाचा आहे.आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात. पुरस्कार दिले जातात.त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. तरीही काही महिलांवर समाजामध्ये अन्याय, अत्याचार होतच असतात, ते होऊ नयेत ,आपल्याला महिलांच्या योगदानाची, तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून द्यावयाचे आहे, पण महिलांना पुढे जाण्यासाठी पुरुषांनीच प्रेरणा दिली पाहिजे, स्त्री आहे म्हणून सर्व काही आहे.घराला घरपण आहे ,तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
“ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला” ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ,ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला,असे आपण सर्वत्र ऐकतो परंतु आजही महिलांना समाजात म्हणावी तशी प्रतिष्ठेची व समानतेची वागणूक मिळत नाही.आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जाणीव जागृती करणे होय, मुलगी जन्मली की अनेक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिरस्कार केला जातो.आनंद कमी होतो वर वर आपण काही बोलत असलो तरी प्रत्यक्ष मुलगी जन्मल्या नंतरच आपला चेहरा सांगतो.
मुलगा हवा होता असे हळुवार बोलले जाते, याचे उत्तर सर्वांनी कृतीने देणे महत्त्वाचे आहे,बोलाची भात आणि बोलाचीच कढी म्हणून आता चालत नाही, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडित ईश्वर विद्यासागर ,स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर या सर्व महान समाजसुधारकांनी महिलांसाठी समानता निर्माण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, समानतेमुळे समाज एकसंघ राहतो हे त्यांना कळाले होते म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजा साठी खर्च केले, समाजात आजही महिलांचे दास्य कमी झालेले नाही.
संविधानानुसार पुरुष आणि महिला समान आहेत असे आपण म्हणतो. ,
हिंदू कोड बिलानुसार डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी पुरुषांबरोबर महिलांना समानता दिली, पण त्याची अंमल बजावणी योग्य पद्धतीने झाली नाही, समाजामध्ये महिलांना तोंडी प्रतिष्ठा देणे सोपे आहे,परंतु कृतीतून व वास्तविक प्रतिष्ठा देणे बऱ्याच जणांना कमी पणाचे वाटते,हुंडा देणे- घेणे समाजासाठी गुन्हा ठरत असला तरीही आपल्यातून काही लोक देणारे आहेत, आणि घेणारे ही आहेत , कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही गोष्टी प्रत्यक्ष बोलल्या जात नाहीत आणि कृतीतून ज्यांनी त्यांनी करत असतात. समाज सुधारकांनी समानता आणण्याचा प्रयत्न केला परंतु आज सुद्धा समाजात महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा आलेली दिसत नाही.
भ्रूणहत्या होणे,महिलांना समाजात दुय्यम समजले जाते,
महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिलांना पुरस्कार दिले जातील, सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल ,परंतु दुसर्या दिवशी काय परत वर्तमानपत्रातून महिलांचा छळ, महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत, त्यामुळे अमुक अमुक महिलेला त्रास देण्यात आला असे अनेक प्रश्न भेडसावत असतात, संयुक्त राष्ट्र संघटनेने महिला दशक साजरे केले ,1975 मध्ये दहा वर्षे महिलांचे प्रश्न जगासमोर मांडले गेले, तरीही महिलांवरील अन्याय आजतागायत कमी झालेले नाहीत, महिला या अबला आहेत,
असेच काही जण समजतात, ते तसे नाही त्या सबला आहेत,सबला होण्यासाठी पुरुषांच्या सहकार्यांची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे ,पुरुषी अहंकार कमी झाला की महिला सुधारल्या म्हणून समजायचं मध्ययुगात रझिया सुलतान ही शासनकर्ती महिला होती ,झाशीची राणी लक्ष्मीबाईने पुरुषा बरोबर हातात तलवार घेऊन लढाई केली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर,पंडिता रमाबाई,रमाबाई रानडे अशा महान महिलांनी महत्त्वाचे सामाजिक व शैक्षणिक कार्य केले, म्हणून समाजामध्ये त्यांच्याबरोबर इतर महिलांनाही सन्मानाने प्रतिष्ठेने वागवावे असे होत नाही.
घरामधूनच तू मुलगी आहेस तुला हे जमणार नाही? तुला ते जमणार नाही ?असे म्हणून समाज मुलीला पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु आज वेळ बदलली, काळ बदलला,कामाच्या जागा बदलल्या, शिक्षणव्यवस्था सर्वत्र सुरु झाल्या, घराघरापर्यंत शिक्षण पोहोचले, महिलांना आत्मसन्मान कळायला लागला अंतराळवीर कल्पना चावला ,सुनीता विलियम्स या मुली अवकाशामध्ये भरारी घेऊन आल्या, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ही अनेक महिलांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलेले आहे हे आपणास कदापि विसरता येणार नाही,
आज गावातील सरपंचापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्या आहेत, असे सर्वत्र आज दिसून येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आता पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली आहे, प्रत्येक कार्यालयात महिला आहेतच त्यामुळे महिलांची आधुनिकतेकडे वाटचाल झालेली आहे, आज विधानसभा, विधानपरिषद लोकसभा व राज्यसभा, यात सर्वत्र महिला प्रत्यक्ष कार्य करताना दिसून येत आहेत,म्हणूनच स्त्रियांची वाटचाल आता आधुनिकतेकडे चाललेली आहे, पूर्वीच्या काळी चूल आणि मूल म्हणून महिलांना दूर ठेवलं जात होतं,
परंतु शिक्षणाची गंगा सुरू झाली आणि महिला ऑफिसमध्ये येऊ लागल्या.
ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी महिला पाठीमागे असतील परंतु शहरी भागांमधील महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, सध्या वेगवेगळ्या चित्रपटातून मालिकांमधून, महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचार दाखवले जातात ,पुन्हा पुन्हा तोच विषय घेऊन महिलांचा छळ दाखवला जातो ,
काही चित्रपटातून महिलांवर अशाच प्रकारचे अन्याय अत्याचार करताना दाखविले जातात, परंतु आता परिस्थिती बदलने आवश्यक आहे,यापुढे चित्रपटात, मालिकेत, नाटकात महिलांचा सन्मान केलेला दाखविला पाहिजे.
चित्रपटातून ,मालिकेमधून महिलांचा मोठेपणा ,सन्मान,प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला जावा, त्यामुळे स्त्री ही आज बहिण,मैत्रीण, आई, मावशी,आजी,काकू या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर खरोखरच तिची आपणाला आज फारच गरज आहे,
स्त्री म्हणजे संस्कृती होय, स्त्री घराला घरपण देते, स्त्रीमुळे कुटुंबेच्या कुटुंबे जोडले जातात आणि समाजाकडे या कुटुंबाची वाटचाल होते.
महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच महिलांचा जाहीरपणे सन्मान करणे गरजेचे आहे. स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल हा फार मोठा विषय आहे. मानवी संस्कृतीने महिलांना प्रतिष्ठा लवकर दिली नाही, बरेच वर्षे संपले परंतु काही समाजसुधारकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांसाठी कार्य केले.
नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ काढून महिलांचा सन्मान केला गेला ,पंडिता रमाबाई ,रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे,डाॅ.आनंदीबाई जोशी.यांनी महिलांसाठी अहोरात्र कष्ट केले,यामुळे त्यांचे नाव आपण आज उत्सुकतेने घेत आहोत ,महिलांना कधीही केव्हाही कमी समजू नये. त्यांचा अपमान करू नये त्यांना समानतेची वागणूक द्यावी. वर्तमानपत्रातून त्यांचा सन्मान व्हावा, पुरुषांनी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलावा ,तेव्हा महिलांची प्रगती उन्नतीच्या दिशेने होईल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांची पदोपदी आठवण करून महिलांनी यशाचा मार्ग शोधावा आणि आपला स्वाभिमान जागूत ठेवून प्रगतीचे पाऊल उचलावे.
८ मार्चला महिला दिन करून तेवढ्यापुरते न थांबता स्त्री शक्तीचा जागर करावा,स्त्री ही दिवसरात्र कष्ट करते ,तिच्याकडे सहनशीलता आहे,संयम आहे, ज्यावेळेस ती कामावर जाते त्यावेळी कामाचे दहा दहा तास ती काम करत होती, परंतु कामगार कायद्याने महिलांचे कामाचे आठ तास केले आहेत, म्हणून “नारी सर्वत्र पूज्यते “महिला एकत्रित आल्यानंतर समाजात नवचैतन्य निर्माण होते,महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नये. घरामध्ये भेदभाव करू नये. शिक्षणाची आवश्यकता आहे म्हणून मुलींना शिक्षण शिकवावे, बालविवाह करू नयेत,अंधश्रद्धा व कर्मकांडाना थारा देऊ नये , अनिष्ट रूढी प्रथा-परंपरा वेडगळ समजुती या सर्व पासून महिलांनी स्वतः दूर राहिल्यास बराच फरक होईल.
आत्मसन्मान मिळेल, आणि महिलांचं दास्य कमी होईल आणि त्या मुक्तीच्या वाटचाली कडे मार्गक्रमण करतील ,तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्याचे समाधान सर्वांना होईल, जुन्या वाटा वर्षानुवर्ष राहिल्या तर महिला त्याच वाटेने जात राहातील तेव्हा समाज उन्नतीच्या दिशेने जाणार नाही. त्यासाठी बदलांची आवश्यकता आहे, तेव्हाच दास्यत्व कमी होईल आणि महिला मुक्त होतील.
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात , स्त्री म्हणजे क्षणा क्षणाची साथ,
स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे संस्कृती होय.
समाजातील सर्व लोकांनी आपल्या बरोबरीने महिलांना घेऊन समानतेने वागविले, तर त्यांना प्रतिष्ठा मिळेल व त्या गुण्यागोविंदाने नांदू शकतील.
महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
साहित्यिक
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव
खैरकावाडी, ता.मुखेड जि. नांदेड