
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- मागील कांहीं कालावधीत वाढलेल्या चोरीच्या घटना थंडावल्या होत्या मात्र गत काही दिवसांपासून छोट्या मोठ्या चोरीच्या घटनेत पुन्हा वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. पारडी शिवारातील शेतातील विहिरीतून कृषी पांपाची पाणबुडी विद्युत मोटार व इतर १४ हजार ७४० रुपये किमतीचे साहित्य चोरी झाल्याची घटना दि. ५ रोजी उघडकीस आली. लोहा शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या पारडी शिवारातील गट क्र. ९३ मध्ये प्रदीप विक्रमराव कांबळे यांची शेती आहे.
त्यांच्या शेतातील रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी त्यांच्याच मालकीच्या विहिरीत तीन एचपी ची पाणबुडी विद्युत मोटार व त्यासोबत ६० फूट सर्व्हिस वायर (केबल) दोराच्या साह्याने सोडण्यात आले होते. दि. ४ मार्च रोजी सायंकाळी विहिरीकडे जाऊन पाहिले असता सर्व साहित्य होते. दैनंदिनी प्रमाणे जनावरांना चारापाणी करून शेतातील गडी आणि शेत मालक कांबळे रात्री घराकडे गेले. दुसऱ्या दिवशी दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान विहिरीकडे जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिले असता सदर ठिकाणी विहिरीत मोटार आणि वायर सोबत असलेला प्लास्टिक पाईप विहिरीतील पाण्यावर कापून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्यामुळे शंका आल्याने विहिरीत उतरून पहिले असता केवळ पाईपच दिसून आला मात्र त्यासोबत १० हजार ८०० रुपये किमतीची पाणबुडी मोटार मिळून आली नाही. तसेच सोबतचे १४४० रुपये किमतीचे ६० फूट वायर आणि २५०० रुपये किमतीचे स्टार्टर देखील चोरी झाल्याचे दिसून आले. असा एकूण १४ हजार ७४० रुपयाचे कृषी पंपाचे साहित्य अज्ञात चोरट्यानी पळविले. बाजूस शोधाशोध केली असता मोटारीस बांधलेला दोर विहिरीलगत पडलेला दिसून आला. याप्रकरणी शेतकरी प्रदीप कांबळे यांनी लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. नि. संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश साखरे करत आहेत.