
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
युगायुगाचा दाटला अंधार जिथे
ज्ञानाचा दिवा लावू
सावित्रीच्या लेकी आम्ही
तिचा विचार वारसा पुढे चालवू
अनंत भोगिले तिने
धर्ममार्तंडांचे अनन्वित छळ
रणरागिणीचे कार्यच
देईल आम्हाला जगण्याचे बळ
सैतानी प्रवृत्तीने घातला होता
तिच्या अब्रूवरही घाला
आत्मविश्वासाने न डगमगता
फोडीला तिने त्या नराधमाला
जप-जाप्य, तंत्र-मंत्रांचा
खुळा मार्ग सोडू
विज्ञानयुगात नशीब, दैव टाळून
प्रकाशाची नवी मळवाट काढू
ओलांडू आता घराचा उंबरठा
खांद्यावर आणू डोईचा पदर
अनिष्ट प्रथांना देऊन मूठमाती
मिळवू जगी माणूस म्हणून आदर
हाताच्या बांगड्या
सारूनिया मागे
दलित, बहुजना, स्त्री उत्थानासाठी
सर्वांनी व्हावे खडबडून जागे
सत्यशील, मानवतेच्या कार्याचा
आम्ही घेऊ आता वसा
‘तिला’ आम्ही आता निर्भीड बनवू
तोच आहे सावित्रीचा वारसा
नवयुगाच्या ‘पाईक’ आम्ही
उद्यमशीलतेचा ध्यास धरू
सत्यशोधनाचा करी घेऊन झेंडा
ढोंगीपणाचे मुखवटे फाडू
फुले दांपत्याच्या विचार कार्याला
देऊ पुन्हा पुन्हा उजाळा
ज्ञानी, विचार प्रवर्तक बनून
घालू दुष्प्रवृत्तीला आळा
स्त्री मुक्तीची गाणे गाऊ
नारी शक्तीचे बळ वाढवू
जोतिबांच्या सार्थ साथीने
सवित्रीसारखे देश नव्याने घडवू
बाईपणाचे न्यून टाळून
विशाल आकाशी झेप घेऊ
आत्मसन्मानाने पराक्रमाची
अनेक शिखरे पार करू
पृथ्वीचेही घेऊन धैर्य
सूर्याचे तेज जगा दावू या
पर्वताची उंची , समुद्राची खोली
हृदयी आपल्या ठेऊ या
डॉ. अश्विनी बेडगे-रोडे
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर
मो. नं. ९०२१० २८७९९