
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- तुमचे घराणे कोणते? या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्यांच्या गायकीतून सिद्ध केली. उन्मुक्त मोकळेपण त्यांच्या स्वरातून आणि आविर्भावातून कायमच व्यक्त होत आले आहे. या असामान्य गायकाने शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आणि आता या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्वाचं म्हणजे वसंतरावांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.
आजपासून या चित्रपटातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्ताने राहुल देशपांडे यांनी आपल्या आजोबांनी अजरामर केलेलं नाट्यगीत ‘घेई छंद’ एका नव्या दमदार रूपात सादर केले. आणि याच सप्तरंगी अल्बममधील ‘घेई छंद’ याच गाण्याचा पहिला व्हिडीओ आज प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
या चित्रपटाचे संगीत म्हणजे प्रेक्षकांसाठी मुक्त अशा विविध रंगांची उधळण असणार आहे. यात ठुमरी, भैरवी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तीगीत, गझल इ. असे संगीताचे विविध प्रकार ऐकायला, पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात एकूण बावीस गाणी असून मनाला भिडणाऱ्या या गाण्यांना दिग्गज गायकांचे स्वर लाभले आहेत. यात श्रेया घोषाल, उस्ताद रशीद खान, राहुल देशपांडे, आनंद भाटे, विजय कोपरकर, अंजली गायकवाड, प्रियांका बर्वे, सौरभ काडगांवकर, जिज्ञेश वझे आणि हिमानी कपूर असे दर्जेदार गायक आपलं गाणं सादर करणार आहे. या गाण्यांना वैभव जोशी, मंगेश कांगणे आणि मयुरेश वाघ यांनी शब्दबद्ध केले आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणून राहुल देशपांडे हे या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत. या निमित्ताने राहुलने पहिल्यांदाच लावणी गाण्याचा प्रयत्न केला असून त्याला दमदार साथ ऊर्मिला धनगरने दिली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.