
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि. 8 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने येत्या शनिवार १२ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे’ आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली होण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी केले आहे.
या लोकन्यायालयामध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली विविध प्रकारची ४५ हजार पेक्षा जास्त प्रकरणे सामंजस्याने तडजोडीने निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये तडजोडयोग्य फौजदारी, निगोशिएबल इन्ट्रुा मेंट अॅक्ट कलम 138, दिवाणी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कामगार वाद, वीज, पाणी देयकांबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन विषयक, नोकरीबाबतची प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे घेण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे विविध बँका, वित्तीय संस्था तसेच दूरध्वनी विभाग, विद्युत विभाग आणि पुणे व पिंपरी महापालिका, पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती यांच्याकडील प्रलंबित पाणीपट्टी, घरपट्टी देयके अशी सुमारे १ लाख ७५ हजारापेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.जिल्ह्यातील वाहतूक पोलीस विभागाकडील विविध नागरिकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत प्रलंबित असलेली परंतु अद्याप न्यायालयामध्ये दाखल न झालेली अशी एकुण ११ लाख प्रकरणे निकाली करण्याकरीता ठेवण्यात आलेली असून यातील सर्व वाहन मालकांना ई-चलन नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
१२ मार्च रोजी पुणे जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये जलद व मोफत न्याय हवा आहे आणि आपला वाद सामोपचाराने मिटविण्याची इच्छा आहे अशा पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा मोबाईल क्रमांक ८५९१९०३६१२ असा असून इमेल आयडी dlsapune2@gmail.com असा आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असून लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सावंत यांनी केले.
2p