
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक घडताना दिसत आहेत. त्यात अधिवेशन सुरू असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी सोडलेली नाही. पार्श्वभूमीवर आज अधिवेशनात नसून अधिवेशनाबाहेर हे नाट्य घडताना दिसून आलं. आज संध्याकाळी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, त्यांना ईडीचे पाचवे एजंट अशी टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे व्यावहारिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यासंदर्भात काही संदर्भांचा उल्लेख करतानाच हे सर्व पुरावे पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात किरीट सोमय्यांनी स्पष्टीकरण केलं आहे. “माझा वाधवान यांच्याशी काडीचाही संबंध नाही. राऊतांना मुंबई पोलिसांनी दोन पानांचं उत्तर दिलेलं आहे. मी कोणत्याही पत्रकार परिषदेत अधिकृत कागद हातात असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोललेलो नाही. हे फक्त नौटंकी करत आहेत”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी सांगितलं की नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांना अटक केली. आता उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही, तर आता उद्धव ठाकरेंनी म्हणावं की ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी हिंमत असेल तर सामनामध्ये अग्रलेख लिहावा त्यांनी की ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. तिथे तर किरीट सोमय्या न्यायाधीश नाही ना? १९ बंगल्यांच्या बाबतीत बोलायची हिंमत का नाही उद्धव ठाकरेंची?” असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.