
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
आदिम संस्कृती संवर्धनासाठी आदिवासी संहितेचे पालन आवश्यक
नंदुरबार :- सातपुड्यातील होळी या नृत्यपथकाला आज अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते. परंतु हे नृत्य कुठल्याही वेळेस व पाहिजे त्या ठिकाणी सादर करता येत नाही. एवढेच नव्हे तर त्याचा साधा सोंगही करता येत नसल्याचे म्हणत आदिम संस्कृती संवर्धनासाठी आदिवासींमधील आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे काळाची गरज आहे, असा मुद्दा काठी (ता. अक्कलकुवा) येथे झालेल्या २३ राज्याच्या महापंचायतीत उपस्थित करण्यात आला. होळी नृत्यासाठी वापरले जाणारे वाद्य व साहित्यांंना मोरखीशिवाय अन्य व्यक्तींनी स्पर्श टाळावा, केल्यास सामाजिक विरोध करण्याचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.
आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी एकता परिषद व अन्य संस्था व संघटनांतर्फे ही पंचायत घेण्यात आली. सभेत काठी संस्थानचे वारस पृथ्वीसिंग पाडवी, एकता परिषदेचे सी.के. पाडवी, डॉ. दिलवरसिंग वसावे, ॲड.अभिजीत वसावे, ॲड. सरदारसिंग वसावे, नागेश पाडवी, जेलसिंग पावरा, वालसिंग राठवा, क्रांती राठवा, सानिया राठवा, काॅ. बाज्या वळवी, केराम जमरा, सरपंच सागर पाडवी, करमसिंग पाडवी, वसावे मोतिराम गुरुजी, प्रेमचंद सोनवणे, डॉ. सायसिंग वसावे, बहादुरसिंग पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी, गणपत पाडवी, ॲड. किरेसिंग पाडवी, ब्रिजलाल पाडवी, दिनू गावीत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली.
अन्यत्र होळी नृत्य सादरीकरणावर बंदीचा निर्णय प्रेक्षकांना सहज आकर्षित करणारे सातपुड्यातील होळी नृत्य पथकांना पाहुण्यांचे स्वागत, लग्नातील वेगळेपणा, गणपती विसर्जन व अन्य कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी आमंत्रण देत नृत्याचे सादरीकरण होते. परंतु ही बाब आदिवासी संस्कृती संवर्धनातील मोठा अडथळा असल्याचे मत या पंचायतीत मांडण्यात आले. खरं तर हे नृत्य केवळ होळीच्या कालावधीतच सादर करता येते, होळीचा व्रतधारी व्यक्तीच हे नृत्य सादर करु शकतो. या व्रताचे महिनाभर काटेकोर पालन करावे लागते, परंतु आज यात स्वार्थ निर्माण झाले असून या स्वार्थापोटी हे नृत्य पटेल तसे अन् वाटेल तेथे सादर होऊ लागले, यावर नियंत्रण आणण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.
यासह या पंचायतीत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी आगामी होळीपासूनच करण्याचा निर्णयही घेण्यात आला. आदिवासी संहितेबाबत मान्यवरांचे मत विधीवत पूजेसाठी आदिवासींमध्ये दुग्धाभिषेक करण्याची प्रथा आहे. ही पवित्र स्नान झाल्यानंतर ती व्यक्ती नियोजित कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत खाटावर बसत नाही, कपडे-बिस्तर अलिप्तच ठेवतो, दगड फेकून मारत नाही. मोठ्या कालावधीचे व्रत (पालनी) पाळतांना प्रामुख्याने पुरुषांनाच ही भूमिका निभावावी लागते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रतिक्रिया आज राजे नसले तरी राजा व प्रजा यांच्यातील पुर्वीसारखे संबंध आजही कायम आहे. त्या राजांनी सुरु केलेल्या परंपरेतील होलीकोत्सव आजही सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या साक्षीने, उपस्थितीत साजरी करण्यात येत आहे.
पृथ्वीसिंग पाडवी, (काठी संस्थानिकांचे वारस)काठी ता. अक्कलकुवा ठराव १. होळी नृत्यातील बांबू टोप, दुधी, पिंपळवर्गीय फळांच्या माळा या साहित्यांच्या विधीवत त्यागानंतर गैरवापर टाळावा.२. व्रतधारी (पालनी पाळणारा) शिवाय अन्य व्यक्तीने होळी नृत्य सादर करणे व साहित्यांचा स्पर्श टाळावे.३. याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी जातांना महिलेने आदिवासी पेहरावच परिधान करावा.४. मेलादा, यात्रा व होळीत कर्णकर्कश आवाजाच्या खेळण्या व वाद्य विक्रीवर बंदी.५. होळीत छिबली नृत्य टाळावे.६. गाव पुंजारांमार्फतच लग्नविधी करावी.७. बनावट दारुचे पुजाविधी टाळावी.८. २१ वय वर्षाआधी मुला-मलीचे लग्न लावून नये.९. दहेज परतीचा वाद न्यायालयात घेऊन जाऊ नये.