
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दिल्ली :- देशातील काही राज्यांत अजूनही थंडीचा कडाका कमी-अधिक प्रमाणात आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रातील थंडी सुरुच आहे. याशिवाय दिवसभरातील सूर्यप्रकाशाचे प्रमाणही वाढले असल्याने तापमानातही बदल होत आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने एंट्री केली आहे. मागील महिन्यात राज्यासह देशात काही ठिकामी अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशातील काही राज्यांत गडगडाटासह हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यात महाराष्ट्रातील काही प्रदेशांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट केले आहे. देशातील महाराष्ट्र, राजस्थान आणि प. मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच पुढील 24 तासांत उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह लगतच्या मराठवाड्यात गडगडाटासह, गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून थंडीसह महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
तसेच दिवसाच्या तापमानातही वाढ आणि घट होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यातील कोकण, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरातून जोरदार वारे वाहत आहे.
या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत असून या हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील काही प्रदेशात गारपीट होत असल्याने पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे. ऐन हंगामात कोकणतही हलक्या सरी बरसणार या अंदाजाने आंबा बागायतदार चिंतीत झाला आहे.