
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापण दिनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. सुरुवातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल केली.
राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे असे म्हणत टीका केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली. राज्यात काय चाललं आहे, सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपवायला निघालेत. विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालते, पण उरलं कोण? उरलो आपण.
आपल्याशिवाय राज्यात पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी सूचित केले. आपल्याकडे सत्ता नाही, तरीही लोक आपल्याकडे न्याय मागण्यासाठी येतात. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते आमच्याकडे येतात, हीच आपली कमाई आहे, असे राज म्हणाले.
सरकार आणि विरोधकांचं असं राजकारण आजपर्यंत बघितले नव्हतं. काय प्रकारचे आरोप करतातय, टीव्हीवर शिव्या देतात, कुठची भाषा आहे. महाराष्ट्रात राजकारणात येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या पिढ्या काय शिकतील. त्यांना वाटेल राजकारणात असं वागायचं असतं. कुठचाही विचार न करता तोंडाला येईल ते बोलतात.
संजय राऊत कसं बोलतात, असं सांगत त्यांची नक्कल केली. चॅनेल लागले की हे सुरु होतात, कुठून आणतात ही अॅक्शन.
संजय राऊत यांची मिमिक्री करताना राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली. संजय राऊत किती बोलतात, कसं बोलतात? म्हणत त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. सध्या सकाळी टीव्ही लावला की ते संजय राऊत येतात, काय ते राऊत, किती बोलतात, कसं बोलतात…? बोलणं हा मुद्दा नाहीय, पण काय बोलावं, कसं बोलावं, असे म्हणत त्यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.
त्यानंतर नाव न घेता एक किस्सा सांगितला. मी एकदा असंच एका कार्यक्रमात गेलो होतो. एक नेता माझ्या शेजारी बसला होता. तेवढ्यात त्याच्या नावाची भाषणासाठी अनाऊन्समेंट झाली. तो मला म्हणाला, आलोच मी भाषण करुन… मग त्याने भाषणाला सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी अतिशय चांगला बोलणारा नेता, वेगळाच आवाज काढू लागला. आता वेगळा आवाज काढायची स्टाईलच झालेय, असे ते म्हणाले.
भुवया उडवून बोलणे, हावभावाने बोलणे, आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या त्यांची ही नाटकी पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावे?, असे म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतनाची गरज असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.