
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज वर्धापन दिन असून हे औचित्य साधून राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याला संजय राऊत यांनी पुण्यातच उत्तर दिलं. संजय राऊत खूप बोलतात असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांची नक्कल देखील केली. त्यावर राऊत म्हणाले की, नक्कल मोठ्या माणसांची केली जाते.
तसेच ईडीची नोटीस आल्यावर आम्ही गप्प बसलो नाही, उलट बोलतोय. तुम्हीपण बोलल पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना देखील ईडीची नोटीस आली होती. तेव्हापासून राज ठाकरे मोदी सरकारवर धडक टीका करताना दिसले नाही. दरम्यान आम्हाला कोणाची भिती नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे.
जे सत्य आहे, जे प्रखर आहे, ते आम्ही बोलणारच असही राऊत यांनी नमूद केलं. यावेळी राऊत यांनी पाच राज्यांच्या निकालावर भाष्य केलं. प्रमुख राज्यांमध्ये परिवर्तन होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आजारी असल्याच्या टीकेवर राऊत म्हणाले की, काही लोक आजारी नसताना देखील सक्रिय नसतात. मुख्यमंत्र्यांइतकं आताच्या घडीला कोणीही सक्रिय नाही, असंही राऊत यांनी नमूद केलं.