
दैनिक चालु वार्ता, वृतसेवा
हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर साधारण 30 ते 40 दिवसातील दाणे कोवळे समजले जातात.
हे दाणे रंगाने हिरवे असतात, तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा मुख्य असतो.
त्या शिवाय वांगे भाजी , भाकरी, दही असा मेनू असतो. हे जेवणातले पदार्थ भागा प्रमाणे बदलतात. त्यासोबत दही देण्याची पद्धत आहे. फेब्रुवारी महिना उजाडताच सर्वांना हुरड्याची आठवण होते. त्यासाठी शहरातील लोक सुट्टी काढून याचा प्लॅन करतात.
हुरडा, कोवळा लुसलुशीत, गुळभेंडीचा. खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक दृढ करणारा. हा हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातला पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे.
हुरडा हा शब्द सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही .
शहरात राहणाऱ्या लोकांना, तेही मराठवाड्याच्या बाहेर जे लोक असतात त्यांना हा शब्द नवीन आहे .साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी च्या कालावधीमध्ये सगळीकडे हुरडा पार्टी अरेंज केल्या जातात .
हुरडा शब्दाचा अर्थ ज्वारीची कोवळी कणसं. आगीमध्ये किंवा शेकोटीत भाजून मग हातावर चोळून किंवा पोत्यामध्ये बदडली जातात आणि त्यानंतर भाजलेले ज्वारीचे कोवळे दाणे बाहेर पडतात त्याला हुरडा म्हणतात. ज्यावेळी हुरडा पार्टी असते त्या त्यावेळी धमाल येते कारण हुरडा म्हणजे एक प्रकारचा फॅमिली किंवा फ्रेंड्स गेट-टुगेदर असतं.आपण आपल्या डिजिटल गोष्टी घरी ठेवून मस्त शेतामध्ये एन्जॉय करू शकतो आणि आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांसोबत करू शकतो .
शेतामध्ये गेलो की मस्त आंब्याला मोहर आलेला असतो काळ्याशार मातीची ढेकळं तुडवत तुडवत आपण हुरडा खायला जातो त्याच्या मध्ये एक वेगळीच मजा असते .या शेतावरच्या जेवणामध्ये हुरडा पार्टीच्या वेळी भरलेल्या वांग्याची भाजी, पिठलं, बाजरीची भाकरी, झुणका, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची, तिळाची चटणी, गूळ ,दही अशा सगळ्या गोष्टींची लज्जत चाखता येते .हूरड्यासाठी जी ज्वारी वापरली जाते त्याला सुरती हुरडा किंवा गुळभेंडी हुरडा असं म्हणतात. ज्वारीच्या हुरड्याप्रमाणे याच काळात गव्हाच्या ओंब्या भाजून ‘हुळा’ खाण्याचा तसेच ज्याला मराठवाड्यात ‘टहाळ’ म्हणतात
तो हरभरा भाजून खाण्याचा आनंदही खूप वेगळाच.
रोज पिझ्झा बर्गर खाणाऱ्या आजच्या जनरेशनला जेव्हा रान मेवा खायला मिळतो तेव्हा ते अतिशय खूष होतात. आता तर प्रत्येकाच्या ओळखीच्या शेतात जाण्याच्या ऐवजी खूप सारे शेतकरी हुरडा पार्ट्या स्वतः आयोजित करतात. 180 ते 200 रुपये किलो प्रमाणे हुरडा मिळतो. ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोह असतं. हुरड्यावर लिंबू पिळलं की, लिंबातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषलं जातं. ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ती शक्तिवर्धक असते. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
ज्वारीत मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिनदेखील असतं. शिवाय, ‘ब’ गटातील जीवनसत्त्वंही असतात. ही सर्व पोषक तत्त्वं आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम करतात. गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटेन नसतं. यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो.