
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. या निकालांना जनादेश म्हणून घेत राजकीय पक्षांनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असे भाजपाने वर्णन केले आहे. त्याचवेळी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकैत यांनी ट्विट करून या निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीच्या महान उत्सवात जनतेचा निर्णय सर्वोपरि आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. आम्हाला आशा आहे की स्थापन झालेली सर्व सरकारे आपापल्या राज्यात शेतकरी आणि मजुरांच्या उन्नतीसाठी काम करतील. विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन,” असे टिकैत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.