
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च रोजी विधानसभेत खळबळजनक गौप्यस्फोट केला. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात सरकारच्या विरोधकांना कट करुन संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याबाबता पुरावा म्हणून त्यांनी तब्बल १२५ तासांचे रेकॉर्डिंग देखील पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सभागृहात सादर केले. फडणविसांच्या या बॉम्बनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
दरम्यान या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ९ मार्च रोजी सभागृहात उत्तर देणार होते. मात्र त्यादिवशी देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित राहु शकणार नसल्यामुळे त्यांनी उत्तर पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र त्यानंतर १० मार्चला विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी फडणवीस गोव्यात होते. तर ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार होता. त्यानंतर १२ आणि १३ मार्च रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार येत असल्यामुळे वळसे पाटील हे उत्तर आता सोमवारी १४ मार्च रोजी देणार आहेत.
दरम्यान या मिळालेल्या ६ दिवसांचा वळसे पाटील यांनी देखील पुरेपूर उपयोग करुन घेतला असल्याचे पहायला मिळत आहे. वळसे पाटील यांनी या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली आहे. शिवाय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि पुण्याच्या डीसीपी सुषमा चव्हाण, मुंबईचे आयुक्त संजय पांडेंसोबत बैठक घेतली. त्यामुळे ६ दिवसांमध्ये भाजपला उत्तर देण्यासाठी वळसे पाटील यांनी बराच दारुगोळा जमवून ठेवला असण्याची शक्यता आहे.
याशिवाय या उत्तराच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुसऱ्यांदा आणि थेट चकमक होणार आहे. यापूर्वी ठाकरे सरकारच्या स्थापनेवेळी वळसे पाटील आणि फडणवीसांच्या पहिल्यांदा चकमक झाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला संवैधानिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहणारे दिलीप वळसे-पाटील हे चांगलाच गृहपाठ करून आलेले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व मुद्द्यांची निराकरण केले आणि विधिमंडळाची बैठक ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कशी योग्य आहे हे सभागृहांमध्ये ठणकावून सांगितले. वळसे पाटील यांनी आपला सर्व अनुभव पणाला लावून सभागृहाचे कामकाज हाताळले. त्यानंतर आता पुन्हा एकदा वळसे पाटील यांना गृहपाठ करायला वेळ मिळाला असून आता नेमकं कोण-कोणावर भारी पडणार हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.