
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
खेड :- रत्नागिरी येथील कवी, लेखक श्री सुनील शरद चिटणीस यांनी ८ मार्च जागतिक दिनाचे औचित्य साधून सामन्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वांवर काही लिहावे असे मनांत योजून आज गायिका कुसुम गोदरो या स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या कलागुणांची महती सादर करायचे ठरवले. दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या अनेक महनीय महिला होऊन गेल्या, होत आहेत त्या डोळ्यासमोर उभ्या रहातात त्यांच्या कतृत्वाने उर भरून येतो त्या सर्वांच्या नावांची यादीच एवढी मोठी आहे की इथे मांडणे वेळेअभावी उचित नाही परंतु अत्यंत गरीब परिस्थितीतून ताऊन सुलाखूनही गायन क्षेत्रात स्वतःचे दमदार पाऊल टाकणाऱ्या श्रीमती कुसुमजी गोदरो यांच्यावर भाष्य करणार आहेत.
त्यांनी त्यांच्यावर लिहीलेल्या लेखाचे मी सुसंवादिका रत्ना हिले सादरीकरण करत आहे. मला आशा आहे आपणांसारख्या रसिकजनांना हे त्यांचे शब्दांकन आवडेल व आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवाल………. सादर करीत आहे दरवळ असाच वाहू दे अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गांव दरीदरीतुन मावळ देवा देऊळ सोडून धाव रे ………. हे गीत सादर करून संपताच टाळ्यांच्या कडकडाटात वन्स मोअरचा जल्लोश सुरु झाला अन कुसुमजींनी हे भावपुर्ण गीत पुन्हा सादर केले. कार्यक्रम होता खेड – रत्नागिरी येथील एल पी इंग्लिश स्कुलच्या एस एस सी १९६९च्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचा.
संमेलन अगदी उत्साहात सुरु होते अन या संमेलनाची सांगता आती रहेंगी बहारे या सदाबहार गीत गायनाच्या कार्यक्रमाने सुरु झाली होती. प्रति किशोर आवाज असलेले गायक अमीतजी राजे गायिका कुसुमजी गोदरो प्रसिद्ध सुसंवादिका रत्ना हिले या कार्यक्रमाची आन बान शान वाढवित होते. ती संध्याकाळ किशोरदा व लतादीदी यांच्या गाण्यांनी इतकी रंगतदार होत होती की खरंच कान तृप्त होत होते. जागतिक किर्तीचे शीळकार व गायक सुरेंद्रजी प्रधान हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुसुमजींना वन्स मोअर देऊन सर्व संगीत प्रेमीं रसिकांनी कुसुमजींचे कौतुकच केले. त्यांच्या गाण्याला जसा इथे वन्स मोअर मिळाला तसा वन्स मोअर त्यांच्या अनेक गाण्यांना अनेक कार्यक्रमांमधून मिळत असतो इतका सुरेल आवाज त्यांचा आहे.
गोड मधुर गळ्याच्या आवाजाचं पवित्र दान परमेश्वरानी त्यांच्या पदरात अलवार भरभरून टाकलं आहे जणुं गान कोकीळाच त्या असं त्यांच्या बाबतीत म्हटलं तर वावगं वाटणार नाही. खरं तर स्वर्गिय लतादीदींच्या आवाजाशी कुणी तुलना करूच शकत नाही हे अगदी वास्तवात खेरेच पण कुसुमजींचा आवाज लतादीदींशी खूपच मिळता जुळता आहे हे ही निखालस सत्यच. माझी अन कुसुम गोदरो यांची ओळख या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या माझ्या खेड येथील घरी झाली, बारीक अंगकाठी, शिडशिडीत देह, डोळ्यात वेगळंच तेज, मितभाषी, गाणे सादर करताना काही हावभाव करीत नाहीत असं व्यक्तिमत्व. त्यांना पाहून या कशा काय लतादीदींच्या गाण्यांना न्याय देऊ शकतील ? हा प्रश्न माझ्या मनांत पडला होता.
माझ्या घरी संध्याकाळच्या कार्यक्रमाची रिहर्सल सुरु झाली अन मी अमीतजीना म्हणालो मला लता दीदींच * रुक जा रात ठहर जारे चंदा इतना मिलन की बेला * हे माझं आवडतं गाणं ऐकवाल का ? तर कुसुमजींनी लगेचच हे गीत म्हणायला सुरवात केली अन माझा मीच मंत्रमुग्ध होऊन डोळे मिटून या गाण्याचा रसस्वाद घेण्यात गुंग होऊन गेलो, गाणं संपलं अन म्हणालो अप्रतिम लाजवाब मारव्हलस शब्दच नाहीत हो तुमचं कौतुक करायला. खरं तर मला कुसुमजींच हे गाणं मोबाइलवर रेकॉर्ड करून घ्यायचं होतं पण मी भारावलेल्या अवस्थेत ते विसरूनच गेलो अन ते गीत त्यांच्याकडून ऐकताना जणु चांदणंच माझ्या अंगावर ओसंडून सांडल्यासारखंच वाटलं अन त्या नगरीतल्या अरमानों का मेळाव्यामधे मीच सामील झालो आहे असा भास झाला, केवळ अप्रतिमच.
या कुसुमचा जन्म अंबरनाथचा तिचे आजोबा ऑर्डिनन्स फॅक्टरीमधे कामाला होते त्यांच्याच घरी वास्तव्य. मूळचे हे कुटुंब आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील, त्यांच्या काही कौटुंबिक कलहामुळे त्यांनी अंबरनाथला स्थलांतर केले. कुसुम सहा वर्षाची असतानाच दुदैवाने पितृछत्र हरपले, रेल्वे अपघातात त्यांचा अकाली मृत्यु झाला. भावंडामधे कुसुम ही मोठी तिला तीन लहान भावंडे होती. त्यातही दुदैव म्हणजे त्या पुढील काळात तिची जीवलग भावंडेही काळाने ओढून नेली, आता एकटीच ती. परिस्थितीही जेमतेमच त्यामुळे शालेय शिक्षणही अपुरेच त्यात तब्बेत नाजुक साजुक असल्यामुळे कुठे जॉब करू शकली नाही.
लहानपणी कुसुम गायची तेव्हा शेजारपाजारचे म्हणायचे की या मुलीचा गळा किती गोड आहे, किती छान गाणी म्हणते ही आवाजाची देणगीच होती ना तिला. पण आयुष्याचा गोफ विणताना काही धागे हातातून निसटतात काही हरवतात असे निसटून गेलेले धागे पुन्हा एकत्र जमवून वस्त्र विणणं कठीण असतं तस तिच झाल होत. अंधाऱ्या रात्री दाट धुक्यातून पायी वाटचाल करताना ठेचकाळत, धडपडत प्रवास करावा असा आयुष्याचा प्रवास तेव्हाच सुरु झाला होता. गरीब परिस्थितीमुळे कुठे गायनाचे धडे, प्रशिक्षण घेणे जमलेच नाही. मग काय? लतादीदींची गाणी रेडिओवर ऐकून त्या बरोबरीने गायचे हा छंदच लागला अन त्यातून ही लहान मुलगी गायला लागली होती.
तिची मावशी दिवा येथे रहायची त्यांचा छोटा अपघात झाला तेव्हा मदतीला सोबतीसाठी कुसुमला बोलावले गेले, तिथे मुलामुलांच्यात अंताक्षरीच्या भेंड्या खेळण्याच्या प्रसंगात वीणा मोरे आंटी यांनी हीचे गाणे ऐकले अन त्यांना त्या काळी आजारे परदेसी मै तो कब से खडी इस पार ये आखियां थक गये पंख निहार व ए दिले नादां ही गाणी टेपरेकॉर्डवर ऐकायला देऊन ही गाणी तू परफेक्ट तयार कर अन कुसुमला दोन्ही गाणी छान म्हणता यायाला लागली अन तिच्या हातात माईक देऊन गाणी सादर करायला सांगितले त्या दिवशी त्यांच्या हातात माईक पहिल्यांदा आला ही त्या उज्वल भविष्याची खुणगाठच होती.
श्री अनील मोरे काकांनी गायनाची पहिली संधी कुसुमला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी गेट वे ऑफ इंडिया जवळच्या शीपवर आर्मीचा एक मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मिळवून दिली. कुसुमच्या हृदयाची धडधड वाढली होती मनांत भीतीचा डोंगर उभा राहीला होता, तरी मनाचा हिय्या करून तयार केलेली तीन चार गाणी त्या सर्व आर्मी जवानांसमोर सादर करून वाहवा मिळवली. तिच्या या गाण्यांनी तिने सर्वांची मने जिंकलीच. वरवर बघता शांत पण आतुन चलबिचल सुरु असलेला तो संगीतमय झरा कुसुमच्या हृदयात खळखळ करीत वहात होता. त्या झर्याला आता दूर दूरचा प्रवास करायची आस लागली होती अन दिडदा दिडदा इंकारणारा हा झरा भविष्यात खूप लांबचा यशस्वी पल्ला गाठणार आहे याची नांदीच त्या कार्यक्रमात झाली.
घरच्या परिस्थितीमुळे मधल्या काळात कुठे लांब जाता आलं नाही तरी छोट्या छोट्या शो मधून गायनाची संधी मिळत राहिली . आई वडील अन जवळचे भाऊबंध गेल्यावर आलेल्या पोरकेपणाच्या जाणिवेतून बाहेर पडणे हे देखील एक दिव्यच असते , अनेक वेळा कुसुम निराश झाली, आत्मविश्वास डळमळला त्या त्या क्षणी तिच्या जिवाभावाच्या असणाऱ्या मैत्रिणी सुसंवादिका रत्ना हिले गायिका विद्या कामत यांनी वेळोवेळी मानसिक आधार देऊन तीचं धैर्य, मनोबल उंचावलं. त्यानंतर गायक अमीत राजे व्हिसलकार सुरेंद्र प्रधान यांनी कुसुमला मोलाची मदत केली अन काही ऑर्केस्ट्रामधून गायनाची संधी दिली. आवाजाची देणगी मुळातच असल्यामुळे त्या आवाजावर हुकमत गाजवत ही कुसुम कुसुमजी म्हणुन नांवारूपास यायला सुरवात झाली……….. कु सु म जी !
होय, गायन क्षेत्रात आपलं नांव कोरायचं , एक वेगळा ठसा उमटवायचा है स्वप्न उराशी बाळगून पुढील संगीतमय वाटेवरचा सुरेल प्रवास हळू हळू सुरु झाला. मोडलेल्या अन घायाळ झालेल्या मनाच्या कुसुमजींच सगळंच हरवलं पण हा आवाज तर माझाच आहे ना? त्या आवाजाची स्वामीनी मीच आहे ना? या माझ्या आवाजाला मी जीवापलीकडे जपेन, त्याच आशेच्या जाज्वल्य किरणां सोबतच माझ्या जीवनाची प्रत्येक सकाळ उगवली पाहिजे हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी निर्माण झाला. त्यांच्या हाताशी कोणतीही अत्यानुधिक साधनं नव्हती फक्त हाती असलेला एकमेव मोबाइल. ना लॅपटॉप, ना चांगला माईक, ना साऊंड सिस्टीम पण मनातली दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत होती अन त्या इच्छाशक्तीच्या बळावरच गायनाच्या माळरानावर स्वछंद विहार सुरू झाला अन याही परिस्थितीत गायनाची अभिरुची जतन करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.
आता आताशा नुकताच त्यांनी नवीन लैपटॉप घेतला आहे इतक्या प्रदिर्घ कालावधीनंतर ! will will find a way या उक्तीप्रमाणे म्हणतात ना, तसा त्यांना राजकोट, जुनागढ येथे कार्यक्रम करण्याची संधी चालून आली अन त्या संधीच त्यांनी सोन केलं तिथे त्यांना चांगलीच बिदागी मिळाली, त्यांच्या रहाण्या जेवण्याची उत्तम सोय केली गेली. झांसी खजुराहो येथे तर कुसुमजींना रोज सलग असा दिड महिन्यांचा कार्यक्रम मिळाला रोज संध्याकाळी शो व्हायचा रसिक प्रेक्षक म्हणुन परदेशी पाहुणे यायचे. भाषा समजत नसली तरी फोक साँगज् त्या सादर करायच्या अन त्या ही किती चक्क पाच भाषेत ! ही गाणी सादर व्हायची. त्या परदेशी पाहुण्यांनी त्यांचं भरभरून कौतुक तर केलेच अन भाघोस टीपही त्यांना दिली, दिड महिन्यांचं मानधन मिळालं ते वेगळंच.
मध्यंतरीच्या काळात त्यांना मानसिक स्वास्थ लाभावे म्हणुन अनील मोरेनी पुढाकार घेऊन इगतपुरीच्या मेडिटेशन केंद्रामधे त्यांना प्रवेश मिळवून दिला अन या मेडिटेशनमुळे त्या पुन्हा आयुष्यात उभ्या राहू शकल्या हे त्या आवर्जुन सांगतात, त्यांच्या आयुष्यात अशी वेळही आली होती पण त्यातूनही त्या सावरल्या हे ही नसे थोडके !
लता दीदींच कोणतं गाणं तुम्हांला जास्त आवडतं हे विचारलं असता काही वेळ त्या स्थब्ध झाल्या अन म्हणाल्या त्यांच कुठल एक गाणं आवडतं हे सांगणंअवघड आहे कठीण आहे, खरं सांगू का मला त्यांची सगळीच गाणी आवडतात. मी मराठी बोलू शकत नाही तरी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या व राजा सारंगा माझ्या सारंगा डोलकऱ्या रे ही मराठी गाणी मला आवडतात. प्ले बॅक सिंगर म्हणुन मला संधी मिळावी ही माझी खूप इच्छा आहे अशी संधी मिळाली तर मी त्या संधीच नक्कीच सोन करीन अस अत्यंत आत्मविश्वासाने त्या सांगतात, खरंच त्यांना अशी संधी मिळावी असं मला ही मनोमन वाटत.
अनील मोरे यांच्यां नंतर त्यांना प्रसिद्ध गायक अमित राजे, रत्ना हिले, सुरेंद्रजी प्रधान यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे त्यांची खरंच मनापासुन ऋणी आहे अन त्यांच्या ऋणात रहाणेच मला अधिक आवडेल हे ही भावनाप्रधान होऊन सांगतात तेव्हा त्यांच्या मनाचा नितळ तळ किती स्वच्छ आहे ते दिसून येते ! या गायन क्षेत्राबरोबरच त्यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आहे त्यात त्यांना ए ग्रेड प्राप्त झाला आहे. त्यांच्या घरीच त्या पार्लर चालवतात व ब्राइड मेकअपच्या ऑर्डसही घेतात. त्यांच वास्तव्य सध्या टिटवाळ्याच्या अलीकडे असणाऱ्या आंबिवली या गावात आहे. कुसुमजीनी भावुक होत एक सुंदर आठवण सांगितली, माथेरान येथे कार्यक्रम होता तेव्हा जयेश जोशींच्या घरी डायमंड मर्चंट आले होते, त्यांनी कुसुमजींच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशिर्वाद दिला.
त्याचबरोबर रिअल मोत्यांचे कानाचे टॉप भेट म्हणुन दिले ते आजही कार्यक्रमाच्या वेळी परिधान करतात त्यांचे आशिर्वाद आठवतात अन मगच गायन सुरु करतात. आशिर्वादाचं असं स्मरण करणाऱ्या कुसुमजी किती भावुक असतील नं असं मनांत येतं. वन्स मोअर मिळाल्यावर त्यांना खूप बरं वाटतं पण त्याचबरोबर मी अजून सराव करून यापेक्षाही चांगलं साररीकरण करावं असं नेहमी त्यांच्या मनांत येतं,केवढा हा त्यांच्या मनाचा थोरपणा ! लग जा गले के आज ये हसी रात हो गयी शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
सर्व सप्तकांमधून लीलया फिरणारा कुसुमजींचा सुश्रवणीय आवाज रसिकांच्या मनाचा ठाव घेतो हे निश्चितच, एक कालावंत म्हणून मला त्यांचा अभिमान आहे, आदर आहे. लतादीदींची गाणी सादर करताना त्या जी शब्दफेक करतात तेव्हा खरंच आपण लतादीदींनाच ऐकतोय असा भास होत रहातो यातच त्यांच्या यशाच गमक आहे असं मला वाटतं.
आयुष्याच्या वाटेवरल्या वळणावळणांचा, खस्ता खात खात केलेला खडतर प्रवास त्यांना आता ४९ वर्षापर्यंत घेऊन आला आहे, त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी मनःपुर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या गायनाचा सुरमयी प्रवास आती रहेंगी बहारे असा बहरत राहू दे, मनसोक्त आनंद देणारा आनंदघन ठरो. गायन क्षेत्रातलं दैदिप्यमान यश त्यांच्या पदरात पडो, फ्ले बॅक सिंगर बनण्याचं त्यांचं स्वप्न लवकर पूर्ण होवो, गायकीचा हा नितळ स्वच्छ गोड गळा सदोदित गाता राहो असं पसायदान मी स्वामींचरणी मागतो.
लेखक सुनील शरद चिटणीस
खेड – रत्नागिरी
जागतिक महिला दिन ८ मार्च